अभिनेता अक्षय कुमार आणि त्याचे देशप्रेम हे आजवर कोणापासूनही लपलेले नाही. एका सैन्यदलातील अधिकाऱ्याचा हा मुलगा पेशाने एक अभिनेता असला तरीही त्याच्यामध्ये एक निस्सिम देशभक्त दडलेला आहे हे नाकारता येणार नाही. देशसेवेसाठी आणि देशवासियांच्या रक्षणासाठी सीमा क्षेत्रांमध्ये प्राण पणाला लावून आपले संरक्षण करणाऱ्या सैन्यदलातील जवानांप्रती अक्षयने नेहमीच विविध मार्गांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. चित्रपटांसोबच सोशल मीडियावही बऱ्यापैकी सक्रिय असणऱ्या खिलाडी कुमारने नुकतेच त्याच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटद्वारे एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत स्वसामान्य जनतेची मदत पोहोचविण्यासाठी एक युक्ति सुचवली आहे.

काही दिवसांपू्र्वी अक्षय कुमारने बंगळुरु येथे झालेल्या घटनेवर टिका करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओनंतर बऱ्याचजणांनी अक्षयला दाद दिली होती. प्रेक्षकांच्या याच प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानत या नव्या व्हिडिओची सुरुवात केली आहे. सैन्यदलातील शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी सर्वसामान्य जनकाही पुढे सरसावते पण, त्यांच्यापर्यंत नेहमी ती मदक पोहोचवायची कशी हे काही त्यांना ठाऊक नसते. त्यामुळे सर्वसामान्यांची मदत शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी अक्षय कुमारने या व्हिडिओद्वारे एका अॅप किंवा संकेतस्थळाच्या सहाय्याने ती मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा पर्याय सुचविला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारने सोप्या शब्दांमध्ये हे सर्वगणित पटवून देण्याचा प्रयत्न करत पारदर्शक व्यवहारावरही भर दिला आहे.

जर का नेटिझन्सनी आणि सर्वसामान्यांनी खिलाडी कुमारला त्याच्या या अनोख्या उपक्रमाला पाठिंबा दिला तर तो या अॅप आणि संकेतस्थळासाठीचे पुढचे पाऊल उचलणार आहे. ज्यामध्ये तो सैन्यदल आणि भारत सरकारचीही मदत घेणार आहे. त्यामुळे खिलाडी कुमार त्याच्या या अनोख्या उपक्रमांमुळे आणि देशभक्तिमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असे म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, अक्षय कुमार लवकरच ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काळा कोट, वकिली रुबाब, कोर्ट, खटला आणि या सर्वाला बनारसची पार्श्वभूमी असलेल्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जवळ आली आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचा हा आगामी चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.