बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांतील भूमिकांसोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसतो. नुकताच अक्षयने आई अरुणा भाटिया यांचा वाढदिवस थोडा अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. दरम्यान त्याने वाढदिवस साजरा करतानाच व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अक्षय आईला वाढदिवशी सिंगापूरमधील कसिनोमध्ये घेऊन गेला होता. अरुणा यांचे संपूर्ण देशातील कसिनो हे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे अक्षयने आईचा वाढदिवस आणखी खास करण्यासाठी सिंगापूरमधील कसिनोला भेट दिली. अक्षयने कसिनोला भेट देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अरुणा या व्हीलचेअरवर बसलेल्या दिसत आहेत.

‘जे काम करायला आवडते ते काम सर्वात जास्त करा आणि माझ्या बर्थडे गर्लने असेच काहीसे केले आहे. मी गेला संपूर्ण आठवडा सिंगापूरमध्ये घालवला आणि माझ्या आईला आवडत असलेल्या जगातील काही खास ठिकाणांना आम्ही भेट दिली. खास करुन कसिनो’ असे कॅप्शन अक्षयने व्हिडीओ शेअर करत दिले आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षयने व्हीलचेअर वर बसलेल्या आईला लंडनची सफर घडवली होती. त्याचा व्हिडीओ देखील त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत त्याने छान असे कॅप्शन दिले होते. ‘लंडनमध्ये आईसोबत थोडा वेळ घालवत आहे. आपण आपल्या आयुष्यात कितीही व्यग्र असू पण आपल्या आई वडिलांना जितका शक्य होईल तितका वेळ द्या. त्यांचे वय वाढत आहे याचे भान ठेवा’ असे कॅप्शन दिले होते.