अक्षय कुमारच्या मार्शल आर्टच्या कौशल्याबाबत सर्वच परिचित आहेत. चित्रपटांत गुडांशी चार हात करणारा नायक कितीही आकर्षक दिसत असला तरीही, दैनंदिन जीवनातही प्रत्येकाला मार्शल आर्ट्सचा संरक्षणासाठी उपयोग करून घेता येऊ शकतो. सर्वानीच मार्शल आर्ट्सचे धडे गिरवले पाहिजेत, असे मत अक्षयकुमारने नेहमीच ठामपणे व्यक्त केले आहे. ‘कलर्स’ वाहिनीच्या ‘कॉमेडी नाईट्स वीथ कपिल’च्या सेटवर मार्शल आर्ट्सचे महत्त्व लोकांना पटवून देण्याची आयती संधी अक्षयकडे चालून आली होती. अक्षयने तिचा पुरेपूर वापर करत स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट्सचा वापर कसा करता येतो, याची काही प्रात्यक्षिके दाखवली.
अक्षय सध्या त्याच्या ‘हॉलिडे’ चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यग्र आहे. या चित्रपटात तो सैन्यदलातील अधिकाऱ्याची भूमिका करतो आहे. ‘हॉलिडे’च्या प्रसिद्धीसाठी त्याने तिसऱ्यांदा कपिलच्या शोला हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने आपल्या भूमिकेच्या अनुषंगाने मार्शल आर्ट्सच्या काही सोप्या डावपेचांनी तरुणी प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चा बचाव कसा करू शकतात याचे काही नमुने दाखवले. या शोमध्ये सेटवर पलकने तिच्या मार्शल आर्ट्सच्या कार्यशाळेचा देखावा उभारला होता. अक्षयने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काहीजणींना बोलावून या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी करून घेतले.