सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट आणि बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. प्रेरणादायी सत्यकथा आणि इतिहासातील काही लक्षवेधी व्यक्तिरेखा या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न असतो. असे चित्रपट प्रेक्षकांना आवडत असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ आणि ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांची चर्चा सुरू असतानाच आता यात आणखी एकाची भर पडणार आहे. बाराव्या शतकातील राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार पृथ्वीराज यांची भूमिका साकारणार आहे.

‘यशराज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार असून ‘चाणक्य’, ‘पिंजर’ यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन करणारे चंद्रप्रकाश द्विवेदी याचे दिग्दर्शक आहेत. ‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार, आदित्य चोप्रा आणि चंद्रप्रकाश यांच्यात चित्रपटाच्या कथेविषयी चर्चा झाली असून एक रिसर्च टीम पटकथेवर काम करणार आहे.

पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच चंद्रप्रकाश यांच्या मनात अक्षयचा विचार होता. अखेर अक्षयकडूनही त्यासाठी होकार मिळाल्याचं समजतंय. या चित्रपटात पृथ्वीराज यांच्या कारकिर्दीसोबतच संयोगिता आणि त्यांची प्रेमकहाणीसुद्धा अधोरेखित करण्यात येणार आहे.

पृथ्वीराज चौहान यांचा जन्म ११६८ साली झाला होता. ते अजमेरचे राजा सोमेश्वर चौहान यांचे सुपूत्र होते. पृथ्वीराज चौहान यांनी वयाच्या १३व्या वर्षी राजगडची गादी सांभाळली होती. महापराक्रमी योद्धा व कुशल धनुर्धर अशी त्यांची ख्याती होती. गझनीच्या शहाबुद्दीन मुहम्मद घोरीने भारतावर सतरा वेळा आक्रमण केले होते. त्यापैकी सोळा वेळा पृथ्वीराज चौहान यांनी त्याचा पराभव केला होता.