सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान या तिघांना मागे टाकत बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमार लवकरच ऐतिहासिक विक्रम रचणार आहे. यावर्षी त्याने तीन चित्रपट प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. एकंदरीत वर्षभरातील त्याच्या चित्रपटांची कमाई १००० कोटी रुपयांचा आकडा गाठणार आहे.

यावर्षी मार्चमध्ये ‘केसरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने २०३ कोटी रुपये कमावले. त्यामुळे अक्षयसाठी वर्षाची सुरुवात दणक्यात झाली. त्यानंतर ‘मिशन-मंगल’ हा मल्टि-स्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. हे दोन्ही चित्रपट मिळून तब्बल ४८० कोटी रुपयांची कमाई अक्षयने केली.

आणखी वाचा : बिग बींच्या पाया पडून रजनीकांत यांनी व्यक्त केली कृतज्ञता

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ४’ या कॉमेडी चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. केवळ २५ दिवसांत ‘हाऊसफुल ४’ने २९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या तिन्ही चित्रपटांची कमाई ७७० कोटींपर्यंत झाली. अक्षयचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार अक्षय लवकरच १००० कोटींचा पल्ला गाठणार आहे.

अक्षय कुमारचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट जवळपास २२५ कोटी कमावेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तविला आहे. त्यामुळे वर्षभरात अक्षयची १००० कोटींची उड्डाणे होण्याची शक्यता आहे. या आकड्यामुळे तो लवकरच सलमानलाही मागे टाकणार आहे. २०१६ मध्ये सलमानच्या चित्रपटांची ९७० कोटी रुपयांची कमाई झाली होती. त्याच्या ‘बजरंगी भाईजान’ व ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांना तिकिटबारीवर चांगला प्रतिसाद मिळाला होता.