‘जो जीता वही सिकंदर’ हा सिनेमा १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हाचा हा सुपरहिट सिनेमा होता. विराट कोहलीच्या आवडत्या सिनेमांपैकी हा सिनेमा आहे. यावरुन या सिनेमाची तेव्हा किती क्रेझ असेल याचा अंदाज येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी आमिर खान आणि विराट कोहली एका कार्यक्रमाअंतर्गत एकत्र आले होते. यावेळी विराटने या सिनेमातील काही मजेशीर किस्से एकवले होते. पण तुम्हाला माहितीये का या सिनेमात आमिर खानसोबत अक्षय कुमारही दिसला असता.

‘जो जीता वही सिकंदर’ हा सिनेमा कॉलेज आयुष्यावर आधारित होता. या सिनेमात आमिर खान आणि आएशा झुल्का यांची मुख्य भूमिका होती. आमिरच्या भावाची भूमिका मामिक सिंहने साकारली होती. हे फार कमी लोकांना माहित आहे की, आमिरच्या भावाची अर्थात रतनची भूमिका आधी आदित्य पांचोली करणार होता. पण काही कारणांमुळे ही भूमिका मामिक सिंगला देण्यात आली. मामिकने या भूमिकेत जीव ओतून अभिनय केला होता.

या सिनेमात अक्षय कुमारला दीपक तिजोरीने साकारलेली नकारात्मक भूमिका करायची होती. अक्षयने यासाठी ऑडिशनही दिले होते. एवढेच काय तर या भूमिकेसाठी मिलिंद सोमणला निश्चितही करण्यात आले होते. पण काही कारणांमुळे ही भूमिका मिलिंद सोमण आणि अक्षय या दोघांकडे न जाता दीपक तिजोरीला मिळाली. दीपकने त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले.