सरत्या वर्षात बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाला चांगलंच यश मिळालं. नवीन वर्षातही अक्षयकडे काही महत्त्वपूर्ण चित्रपट आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘गोल्ड’. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या चित्रपटाची शूटिंग नुकतीच संपली आहे. शूटिंग संपल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये अक्षय धोती- कुर्ता या पारंपरिक वेशभुषेत पाहायला मिळतोय. अॅक्शन असा आवाज येताच खुर्चीवर पाय ठेवून पुढे येत कोलांटउडी मारत अक्षय पुढे जातो. मागे समुद्रकिनारा आणि सूर्यास्ताचा सुंदर देखावा लक्षवेधी ठरतो. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘सुरुवात चांगली झाल्यास अंतही चांगली होतो…’गोल्ड’ची शूटिंग संपली. चित्रपटाच्या टीमसोबत हा एक अविस्मरणीय प्रवास होता.’

वाचा : …अन् माधुरी हॉकी स्टीक घेऊन आमीरच्या मागे पळाली

रिमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’ची निर्मिती एक्सेल एण्टरटेनमेन्ट करत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली लंडनमध्ये झालेल्या १४व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. १९४८, १९५२ आणि १९५६ अशा तीनही ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं नाव उंचावणाऱ्या हॉकीपटू बलबीर सिंग यांची कथा ‘गोल्ड’मध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. या चित्रपटाने टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.