काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. क्रीडाक्षेत्रापासून कलाविश्वापर्यंत प्रत्येक स्तरावर या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. त्यासोबतच अनेकांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमारने भारत के वीर या अॅपच्या सहाय्याने तब्बल सात कोटी रुपये मदतनिधी जमा केल्याचं सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत केली. त्यासोबतच क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचं मान्य केलं आहे. त्यानंतर आता अभिनेता अक्षयकुमारने देखील आपली सामाजिक जबाबदारी राखत मोठं पाऊल उचलल्याचं पीपिंगमूनने म्हटलं आहे.

अक्षयने भारत के वीर. या अ‍ॅपच्या माध्यमातून मदतनिधी गोळा केला आहे. विशेष म्हणजे अक्षयने केवळ दिड दिवसात सात कोटी रुपयांचा आर्थिक मदतनिधी जमा केला असून त्याने स्वत: या निधीमध्ये पाच कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. अक्षयने २०१७ मध्ये भारत के वीर. या अॅपची सुरुवात केली. या अॅपच्या माध्यमातून तो शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत करत असतो. यावेळी देखील त्याने शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अ‍ॅप आणि वेबसाईटची मदत घेण्याचे आवाहन केलं आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील अक्षयने सामाजिक जबाबदारीचं भान राखत मदतीचा हात पुढे केला आहे. केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपस्थितीमध्येही त्याने केरळवासीयांसाठी आर्थिक मदत केल्याचं पाहायला मिळालं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumars bharat ke veer collects rs 7 crore for pulwama martyrs kin
First published on: 17-02-2019 at 17:58 IST