बॉलीवूड कलाकारांच्या चाहत्यांचे त्यांच्या आवडत्या कलाकारासाठी असलेले प्रेम ब-याचदा आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा हे चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी ब-याच सीमा ओलांडतात. त्यांना कशाचीच चिंता राहत नाही. यावेळी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्यासोबतही असेच काहीसे पाहायला मिळाले. त्याच्या एका चाहत्याने असे काही केले की अक्षयला त्याची भेट घेतल्यावाचून राहावले नाही.

अक्षय कुमारचा हा चाहता त्याला भेटण्यासाठी हरिद्वारवरून मुंबईला सायकलवरून आला. याबाबतची माहिती अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. इतकेच नव्हे तर त्याचा हा चाहता त्याच्यासाठी हरिद्वारवरून गंगाजलही घेऊन आला. पण, अक्षयला त्याच्या चाहत्याचे असे वागणे आवडले नाही. अक्षयने त्याच्या चाहत्यासोबतचा फोटो शेअर करत म्हटले की, हा व्यक्ती हरिद्वार येथून सायकलवरून मला भेटण्यासाठी आला. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो, कृपया असे काही करू नका. अक्षयच्या या चाहत्याने सायकलवर एक पाटीदेखील लावलेली फोटोत पाहावयास मिळते. त्या पाटीवर लिहलेय की, अक्षय कुमारचे चाहते हरिद्वारवरून सायकल यात्रा करत त्याच्यासाठी गंगाजल घेऊन भेटायला जात आहेत.

दरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मागील वर्षात एअरलिफ्ट आणि रुस्तम यासारखे दमदार चित्रपट दिल्यानंतरही त्याचे फिल्मफेअर पुरस्कारामध्ये वर्णी लागली नव्हती. फिल्मफेअरच्या शर्यतीतून अक्की अर्थात अक्षय कुमार पात्र ठरला नसला तरी आता त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, आगामी चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणखी एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘गोल्ड’ नावाच्या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाच्या भूमिकेमुळे त्याची चांदी होणार असल्याचेही समजते. अक्षयने या चित्रपटासाठी बॉलिवूड कारकिर्दीतील सर्वाधिक मानधन घेतल्याची चर्चा सुरु आहे.

‘गोल्ड’ हा चित्रपट भारतीय हॉकीपटू बलबीर सिंगच्या जीवनावर आधारित आहे. बलबीरने १९४८, १९५२ आणि १९५६ मध्ये भारतीय संघाला सुवर्ण पदकाची कमाई केली होती. अक्षय कुमार या चित्रपटामध्ये बलबीरच्या भूमिकेत दिसणार आहे. रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करणार असून ‘गोल्ड’ हा चित्रपट फरहान अख्तर यांच्या होम प्रोडक्शनच्या साथीने तयार करण्यात येणार आहे. सध्या मिळणाऱ्या माहितीनुसार, अक्षय कुमारने या चित्रपटासाठी तब्बल ५० कोटी रुपये मानधन घेतल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटामध्ये ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात मिल्खा सिंगच्या भूमिकेत दिसलेल्या फरहानला अक्षयसोबत सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र फरहानने ही भूमिका नाकारल्याचे समजते. अक्षय कुमार ‘जॉली एलएलबी २’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट ‘जॉली एलएलबी’ चा सिक्वल असून १० फेब्रुवारी २०१७ ला या चित्रपटातून अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी अक्षय कुमारने ४२ कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. अर्थातच आगामी ‘गोल्ड’ या चित्रपटासाठी अक्षयला ५० कोटीचे मानधन हे सर्वोच्च ठरणार आहे.