शमीत अमीन यांचा बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला घेऊन बनवलेला ‘चक दे इंडिया’ हा सिनेमा हॉकीवर बनवलेला आतापर्यंतचा सर्वात उत्तम सिनेमा मानला जातो. पण आता खिलाडी कुमार जर हॉकीवरच एखादा सिनेमा करत असेल तर नक्कीच त्यात काही तरी वेगळे असणार हे काही नव्याने सांगायला नको. आता अक्षय ‘गोल्ड’ या सिनेमातून ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्ण मिळवण्याची गोष्ट मोठ्या पडद्यावर आणत असला तरी यात एक मोठा ‘ट्विस्ट’ आहे.

भारतीय पुरुष हॉकी टीमने १९४८ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. रिमा कागती याच घटनेवर आता गोल्ड हा सिनेमाही बनवत आहे, ज्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. अक्षय यात हॉकी स्टार बलबीर सिंग यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. पण रिमा कागती हिचा हा सिनेमा फक्त खेळाभोवतीच आणि सुवर्ण पदक मिळणाऱ्या क्षणापर्यंतच मर्यादीत राहणारा नाहीए. सिनेमात एक फार मोठा ड्रामा होणार आहे आणि हाच ड्रामा या सिनेमाचे बलस्थान असल्याचे म्हटले जात आहे. तिने सांगितले की, गोल्ड हा सिनेमा फक्त हॉकी या खेळाची गोष्ट नाहीए.

हा एक सिनेमा आहे आणि यात एक मजबूत ड्रामा असलेली कथा आहे. रीमाला ही कल्पना गीतकार अंकुर तिवारी यांनी दिली होती. या कल्पनेवर नंतर लेखक राजेश देवराज यांनी संहिता लिहिली आहे. रीमा यांनी पुढे सांगितले की, या खेळाचे तेव्हाचे कोणतेही ऐतिहासिक दस्तावेज आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सिनेमात त्यावेळच्या खेळाचे संपूर्ण चित्रिकरण हे काल्पनिक असणार आहे. रीमाने जेव्हा पासून या सिनेमाची घोषणा केली आहे. तेव्हा पासून ‘गोल्ड’ या सिनेमाची तुलना शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’शी केली जात आहे.