बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया याचं निधन झालंय. अक्षय कुमारने स्वत: एक ट्वीट करत ही दुःखद बातमी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने अरुणा भाटिया  यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारच्या आईच्या निधनानंतर बॉलिवूडमधूनही दु:ख व्यक्त केलं जातं आहे.

अक्षय कुमारने आईच्या निधनानंतर एक भावूक ट्वीट केलं आहे. यात तो म्हणाला, “ती माझं सर्वस्व होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती” अशा आशयाचं ट्वीट अक्षयने केलंय.

अक्षय कुमारच्या या ट्वीटनंतर त्याच्या अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील अरुणा भाटिया यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल होतं. ही बातमी मिळताच अक्षय कुमार त्वरित लंडन होऊन मुंबई परतला होता. अक्षय कुमार दिग्दर्शक रंजीत तिवारी यांचा आगामी चित्रपट ‘सिंड्रेला’ च्या शूटिंगसाठी काही दिवसांपासून लंडनमध्ये होता. मात्र आईच्या प्रकृतीची ठिक नसल्याने तो सोमवारी मुंबईत परतला.

अक्षय कुमार आपल्या आईसोबत रुग्णालयांमध्ये होता. त्यानंतर आईची विचारपूस करणाऱ्या चाहत्यांचे त्यांने एक पोस्ट शेअर करत आभार मानले होते., “माझ्या आईच्या प्रकृतीबद्दल तुमची एवढी काळजी पाहून मी निशब्द झालो आहे. हा काळ मी आणि माझ्या कुटुंबासाठी हा काळ फार कठीण आहे. तुम्ही सगळ्यांची प्रार्थना खूप मदतीची ठरेल” असं तो या पोस्टमध्ये म्हणाला होता. मात्र बुधवारी सकाळी अक्षय कुमारच्या आईचं निधन झालं आहे.