बाल रंगभूमीवर गाजलेले रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाटय़ पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर होणार आहे. येत्या १२ मे रोजी या बालनाटय़ाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे दूरचित्रवाहिन्यांवरच्या मालिकांमधील आघाडीचे दोन कलाकार या बालनाटय़ाशी महत्त्वाच्या भूमिकेत निगडित आहेत.

अभिनेते वैभव मांगले या बालनाटय़ात ‘चेटकीण’ ही भूमिका करत असून अभिनेते, लेखक चिन्मय मांडलेकर याचे दिग्दर्शक आहेत. ‘झी मराठी’ हे पहिल्यांदाच बालनाटय़ सादर करत असून याची निर्मिती ‘अद्वैत थिएटर्स’ यांची आहे.

‘अद्वैत थिएटर्स’चे राहुल भंडारे ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना म्हणाले, गेली दहा ते बारा वर्षे व्यावसायिक रंगभूमीवर निर्माता म्हणून काम करतो आहे. मराठी रंगभूमीचा नवा प्रेक्षक वर्ग तयार होत नाही, तोच तोच ठरावीक वयोगटातील प्रेक्षक दिसून येतो. मराठी रंगभूमीसाठी नवा प्रेक्षक वर्ग तयार करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पाया म्हणजे बाल रंगभूमी आहे. पण बाल रंगभूमी किंवा बाल नाटय़ चळवळ आज म्हणावी तितकी सक्षम नाही. बाल रंगभूमी सक्षम केली तर मराठी रंगभूमीला भविष्यात चांगला प्रेक्षकवर्ग मिळेल आणि त्यासाठी ‘अद्वैत थिएटर्स’तर्फे बालनाटय़ सादर करण्याचे आम्ही ठरविले. ‘झी मराठी’कडे प्रस्ताव दिला आणि त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

बालनाटय़ सादर करायचे तर कोणते?, असा विचार जेव्हा मनात आला तेव्हा काही वर्षांपूर्वी गाजलेले आणि आत्ताच्या काळालाही समर्पक असलेले रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेले ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक  डोळ्यासमोर आले. हॅरी पॉटर, डोरेमानच्या जमान्यातील आजच्या पिढीलाही हे बालनाटय़ नक्की आवडेल, असा विश्वासही भंडारे यांनी व्यक्त केला.

बालनाटय़ात ‘चेटकीण’ ही भूमिका साकारणारे वैभव मांगले यांनी सांगितले, मोठय़ा कलाकारांनी बालनाटय़ात काम करण्याचे प्रमाण परदेशाच्या तुलनेत आपल्याकडे कमी आहे. परदेशात मोठे कलाकार बाल नाटय़ातून काम करतात.  उदारहण द्यायचे झाले तर ‘लायन किंग’चे देता येईल. खरे सांगायचे तर आता सध्या आपल्याकडे बालरंगभूमी अस्तित्वातच नाही. मे महिना किंवा दिवाळीच्या सुट्टीत फक्त बालनाटय़े सादर होऊन नंतर ती गायब होतात. दर शनिवारी आणि रविवारी किमान सकाळचा एक प्रयोग तरी बालनाटय़ाचा झाला पाहिजे. सुधाताई करमरकर, विद्या पटवर्धन आणि अन्य मंडळींनी सुरू केलेली बालनाटय़/बाल  रंगभूमीची चळवळ पुढे सुरू राहिली पाहिजे. ‘अलबत्या गलबत्या’च्या निमित्ताने बालरंगभूमी पुन्हा एकदा पुनरुज्जीवित व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘अलबत्या गलबत्या’मधील ‘चेटकीण’ ही भूमिका मला करायला मिळाली आणि पुन्हा एकदा एका गाजलेल्या बालनाटय़ाचा एक भाग झालो याचा मला विशेष आनंद आहे. आत्ताची पिढी ही संगणक, भ्रमणध्वनीच्या काल्पनिक जगात अधिक रमलेली असून त्यांना अशा चांगल्या बालनाटय़ाच्या माध्यमातून जिवंत नाटय़कलेचा अनुभव मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशी बालनाटय़े सातत्याने मोठय़ा प्रमाणात सादर झाली तर त्याचा भविष्यातील प्रेक्षकवर्ग घडवण्यास मोठा हातभार लागणार असल्याचेही मांगले म्हणाले.

बाल रंगभूमी नांदती ठेवण्याचा प्रयत्न

नवा प्रेक्षक रंगभूमीसाठी मिळवायचा असेल तर बाल रंगभूमी गाजती आणि नांदती ठेवणे आवश्यक आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाटय़ पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत. ‘झी मराठी’च्या नीलेश मयेकर यांच्यापुढे हा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. हे बालनाटय़ असले तरीही आत्ताचे जे मोठे पूर्वी लहान होते त्यांच्यासाठीही हे नाटक आहे. ‘अलबत्या गलबत्या’च्या निमित्ताने मुंबईतील बाल रंगभूमी पुनरुज्जीवित होईल, असा विश्वास वाटतो.      – चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक-अलबत्या गलबत्या.