कॅमेरा फिल्ममधून चित्रपट चित्रीकरणाचा सुरू झालेला प्रवास टुडी अ‍ॅनिमेशन, क्रोमा की, एचडी, एचडी प्लस, थ्रीडी अ‍ॅनिमेशन असा करत करत आज आभासी वास्तव तंत्रज्ञानापर्यंत पोहोचला आहे. आणि याच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ‘कार्ने वाय एरिना’ या चित्रपटाला विशेष ऑस्कर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक अलेहांद्रो गोन्झालेझ यांनी केले आहे. या चित्रपटाची लांबी केवळ सात मिनिटे असून आभासी तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेला हा जगातील पहिला अधिकृत सिनेमा आहे. याआधी १९९६ साली ‘द टॉय स्टोरी’ या चित्रपटाला सिनेमा तंत्रज्ञानातील विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान केला गेला होता. त्यानंतर गेल्या २०वर्षांत अद्याप दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला नाही. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी राज्यपाल पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला ऑस्कर मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅकॅडमी पुरस्कार कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन हडसन यांनी दिली. कोणतेही नवीन संशोधन केले जात असताना ते करणाऱ्या संशोधकांना वेडय़ात काढले जाते. पण एकदा का त्यांना यश मिळाले की संपूर्ण जग त्यांना आपल्या डोक्यावर घेऊन नाचते. असाच काहीसा अनुभव या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान आला, अशी प्रतिक्रिया कलाकार टोय लेईने दिली. दिग्दर्शकाच्या मते चित्रपट निर्मितीच्या इतिहासात डोकावून पाहता आपल्याला विविध टप्प्यांवर आलेले ‘द ब्लेअर विच प्रोजेक्ट’, ‘द ब्रेकफास्ट क्लब’, ‘टॉय स्टोरी’, ‘टायटॅनिक’, ‘अवतार’ यांसारख्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिसतात. ज्यांनी चौकटीबाहेरचे प्रयोग करून सिनेमा व्यवसायाची दिशा बदलून टाकली. ‘कार्ने वाय एरिना’ हा चित्रपटदेखील सिनेसृष्टीत अशीच क्रांती घडवून आणेल, असा विश्वास अलेहांद्रो यांनी व्यक्त केला आहे.