बॉलिवूडची ‘मिस हवाहवाई’ म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी ही आजही अनेकांच्याच आवडीची अभिनेत्री आहे. श्रीदेवीच्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘सदमा’ या चित्रपटाचे नाव नेहमीच अग्रस्थानी असते. या चित्रपटामध्ये श्रीदेवीने केलेल्या अभिनयाला अनेकांचीच दाद मिळाली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटासाठीची रसिकांमधील उत्सुकता मात्र कमी झालेली नाही. त्यामुळे या चित्रपटाची लोकप्रियता पाहता ‘रिमेक’च्या या दिवसांमध्ये श्रीदेवीचा गाजलेला ‘सदमा’ हा चित्रपट सुद्धा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.
या रिमेकच्या निमित्ताने ‘सदमा’ चित्रपटामध्ये श्रीदेवीने साकारलेल्या भूमिकेसाठी काही काळापूर्वी करिना कपूरला विचारण्यात आले होते. पण, काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे आता परिणीती चोप्रा आणि आलिया भट्ट या दोन्ही अभिनेत्रींची नावे श्रीदेवीच्या भूमिकेसाठी चर्चेत असल्याची माहिती एका इंग्रजी संकेतस्थळाने प्रसिद्ध केली आहे. ‘सदमा’च्या रिमेक बद्दल आणखी काही माहिती अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच या चित्रपटातील इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार हे सुद्धा गुपितच ठेवण्यात आले आहे. असे असले तरीही ‘सदमा’मध्ये साकारलेल्या श्रीदेवीच्या भूमिकेसोबत या रिमेकमध्ये न्याय करण्यात यावा अशीच आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आलिया आणि परिणीती सध्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका कार्यक्रमासाठी आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा एकत्र आल्या होत्या तेव्हापासूनच चित्रपटवर्तुळात या दोन्ही अभिनेत्रींच्या मैत्रीची चर्चा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2016 7:36 pm