आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांचा राजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कामगिरी करत आहे. ११ व्या दिवशीही हा सिनेमा कोटींच्या कोटी उड्डाणे घेताना दिसत आहे. सिनेमा जर अशीच गगन भरारी घेत राहिला तर लवकरच १०० कोटींची कमाईही करु शकतो. सिनेमाची खास गोष्ट म्हणजे प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या आठवड्यापेक्षा जास्त कमाई झाली आहे. शुक्रवारी डेडपूल २ हा हॉलिवूडपट प्रदर्शित होऊनही राजी सिनेमाच्या कलेक्शनवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी मांडलेल्या आकड्यांनुसार, राजी सिनेमाने पहिल्या आठवड्यात ५६.५९ कोटी रुपयांची बॉक्स ऑफिस कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी सिनेमाने ४.७५ कोटी, शनिवारी ७.५४ कोटी रुपयांचा गल्ला कमावला. पण खरं आश्चर्य तर पुढेच आहे. दुसऱ्या आठवड्याच्या रविवारी सिनेमाने पहिल्या दिवसापेक्षा जास्त अर्थात ९.४५ कोटी रुपयांची कमाई केली. तर सोमवारी सिनेमाने ३.०७ कोटी रुपये कमावले. या ११ दिवसांमध्ये सिनेमाने आतापर्यंत ८२.०३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

शाहरुखच्या लेकीविषयी या पाच गोष्टी माहितीयेत का?

सिनेमात आलिया भट्ट आणि विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. सिनेमात दोघांनी पती- पत्नीची व्यक्तिरेखा साकारली आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी सिनेमात आलियाच्या आईचीच भूमिका साकारली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलझार यांनी केले आहे. संपूर्ण सिनेमात आलिया आणि विकीच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. तसेच मेघना यांनी ज्या पद्धतीने भारत- पाकिस्तानचा वाद सिनेमात सांभाळला त्या कौशल्याचेही कौतुक केले जात आहे. २ तास २० मिनिटांच्या या सिनेमाला अनेक चित्रपट समिक्षकांनी ४ स्टार दिले आहेत.

सिनेमातील आलिया आणि विक्कीच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले जात आहे. आलियाच्या सर्वोत्तम सिनेमातील हा एक सिनेमा असेल असे अनेक सिनेतज्ज्ञांचे मत आहे. सिनेमाच्या यशाची घौडदौड अशीच कायम राहिली तर आलियाचा हा सिनेमा लवकरच १०० कोटींच्या घरात जाईल या गोष्टीला तुम्हीही ‘राजी’ व्हाल, हो ना?