बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २४ फेब्रुवारीला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली. टीझरमधील आलियाचा हटके लूक, तिचा अभिनय या सर्वाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याचे म्हटले जात आहे.

आजतकते दिलेल्या वृत्तानुसार, ‘गंगूबाई काठियावाडी’ या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथेवर आक्षेप घेण्यात आला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी या चुकीच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा दावा कामाठीपुरा येथे राहणाऱ्या काही रहिवास्यांनी केला आहे. तसेच ‘कामाठीपुरा की आवाज’ नावाच्या एका या संघटनेने चित्रपटाविरोधात आवाज उठवला आहे. कामाठीपुराचा इतिहास बदलण्यासाठी येथील लोकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. हा चित्रपट येथील वर्तमानवर परिणाम तर करेलच पण भावी पिढीवर देखील याचा प्रभाव पडेल असे ते म्हणाले.

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात निर्मात्यांनी कामाठीपुराच्या २०० वर्षाच्या इतिहासाशी छेटछाड केल्याचा आरोप करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथेमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रदर्शना पूर्वीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या वादावर संजय लीला भन्साळी यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील टप्पे चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केलाय. गंगूबाई काठियावाडी हे पात्रं भन्साळींना हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून भेटलं आहे. गंगूबाई कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. मूळच्या गुजरातच्या असलेल्या गंगूबाईंनी अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमात पडून विवाह केला आणि मुंबईत पळून आल्या. मात्र त्यांच्या पतीने त्यांना केवळ ५०० रुपयांसाठी वेश्या व्यवसायात ढकललं.