21 October 2019

News Flash

अभिनयावरून टोमणा मारणाऱ्या कंगनाला आलियाचं शालीनतेने उत्तर

आलियाच्या या उत्तराचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

कंगना रणौत, आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट बी-टाऊनमध्ये फार कोणाशी पंगे घेताना दिसत नाही. तिच्यावर टीका करणाऱ्यांनाही आलिया सभ्यतेने उत्तर दिल्याचं पाहायला मिळतं. अभिनेत्री कंगना रणौतने नुकतंच आलियाच्या ‘गली बॉय’ या चित्रपटातील अभिनयावरून टीका केली होती. यावर आलियाने शालीनतेने उत्तर देणं योग्य समजलं. आलियाच्या या स्वभावाचं कौतुक सध्या अनेकजण करत आहेत.

आलिया भट्टशी तुलना केल्याने कंगनाचा पारा चढला होता. एका वेबसाइटने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी पोल घेतला होता. या पोलमध्ये कंगनाला ३७ टक्के तर आलियाला ३३ टक्के मतं मिळाली होती. यावर कंगनाची प्रतिक्रिया विचारली असता ती म्हणाली, ‘मला खरंच लाज वाटतेय. ‘गली बॉय’च्या परफॉर्मन्समध्ये टक्कर देण्यासारखं आहे तरी काय?प्रसारमाध्यमांनी या फिल्मी मुलांना खूप डोक्यावर उचलून घेतलंय. सुमार दर्जाच्या कामगिरीचं कौतुक करणं थांबवा, अन्यथा आपला दर्जाच कधी त्याहून वर नाही जाणार.’

कंगनाच्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना आलिया म्हणाली, ‘मी कंगनाच्या कामाचा आणि तिच्या मतांचा आदर करते. तिला एखादी गोष्ट त्याप्रकारे वाटत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. ‘राजी’ चित्रपट पाहिल्यानंतर तिने माझ्या अभिनयाचं केलेलं कौतुक मला आजही आठवतंय. मला फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. मी आणखी मेहनत घेतल्यास कदाचित तिला माझं अभिनय भावेल आणि ती माझं कौतुक करू शकेल.’

आलियाने याआधीही चतुराईने टीकांचा सामना केला होता. तर कंगनाने याआधीही आलियाला लक्ष्य केलं होतं. पण अशा टीकाटिप्पणींना भावनिक नव्हे तर व्यावसायिकरित्या कशाप्रकारे हाताळावे हे आलिया उत्तमरित्या शिकली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

First Published on April 15, 2019 3:52 pm

Web Title: alia bhatt has a classy response to kangana ranaut jibe at gully boy performance