बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. चित्रीकरणादरम्यान आलियाची प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे काही वेळातच तिला रुग्णालायातून डिसचार्ज देण्यात आला. सध्या आलियाची प्रकृती ठिक असल्याचे समोर आले आहे.

चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना आलियाला हायपर अॅसिडीटी झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर काही वेळातच आलियाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आणि तिला डिसचार्ज देण्यात आला. त्यानंतर आलियालाने दुसऱ्या दिवशी पुन्हा चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली.

आणखी वाचा- करोना काळात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मास्टर’ची बॉक्स ऑफिसवर जादू

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गंगूबाई काठियावाडी हे पात्रं भन्साळींना हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून भेटलं आहे. गंगूबाई कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. मूळच्या गुजरातच्या असलेल्या गंगूबाईंनी अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमात पडून विवाह केला आणि मुंबईत पळून आल्या. मात्र त्यांच्या पतीने त्यांना केवळ ५०० रुपयांसाठी वेश्या व्यवसायात ढकललं.

आणखी वाचा- ‘अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का?’ कंगनाचा निर्मात्यांना संतप्त सवाल

कामाठीपुरातच वेश्या व्यवसाय करत असताना गंगूबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लाला यांच्याशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधली. आपल्या या बहिणीला मग करीम लालाने अवघा कामाठीपुराच हातात दिला, असे सांगितले जाते. गंगूबाईंनी हा व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधीही कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नाही. उलट, मुंबईतून वेश्या व्यवसायच काढून टाकण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाचे नेतृत्वही गंगूबाईंनी केले होते. अशा गंगूबाईंची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे.