गतवर्षी सोनम कपूर-आनंद अहुजा यांच्या रिसेप्शनला एकत्र हजेरी लावल्यापासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेरच्या चर्चांनी जोर धरला. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेले दोघांचे फोटो आणि मुलाखतींमध्ये एकमेकांसाठी केलेली वक्तव्यं यांमुळे या दोघांच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला. इतकंच नव्हे तर रणबीर-आलिया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. पण लग्नाबाबत आलियाची आई सोनी राजदान यांनी तिला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
‘आलिया तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जे काही निर्णय घेते त्याचा मी सन्मान करते. फार कमी वयात तिने काम करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तिने जे काही मिळवलंय त्याबद्दल मी फार खूश आहे. पण त्याचसोबत मी तिला नेहमी सावध राहण्याचा सल्ला देते. आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी सध्या ती खूप लहान आहे. माझ्या मते, लग्न करण्यासाठी एक योग्य व्यक्ति मिळाली की, तुम्ही लग्नाचा निर्णय घ्यायलाच हवा. पण याचा अर्थ हा नाही की, घाईघाईत लग्न करून मोकळे व्हावे. हा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला जावा,’ असं त्या म्हणाल्या.
रणबीर- आलिया आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या जोडीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2019 11:30 am