आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडचं सध्याचं चर्चेत असलेलं जोडपं. सार्वजनिक ठिकाणी किंवा इव्हेंटमध्ये हे जोडपं सर्रास दिसतं. त्यातून रणवीर- दीपिका, प्रियांका – निक यांच्या लग्नानंतर या दोघांनाही लग्नाच्या प्रश्नावरून अनेकजण भंडावून सोडतात. नुकताच ‘गली बॉय’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या आलियाला पुन्हा एकदा लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी आलियानं आपल्या स्टाईलनं प्रश्नाचं उत्तर दिलं.
‘गेल्यावर्षी दोन मोठे विवाहसोहळे पार पडले. आता लोकांना त्यातून बाहेर येऊ दे. लग्नाचं नंतर पाहू तोपर्यंत सगळ्यांनी चांगले चित्रपट पहा आणि मज्जा करा’ असं उत्तर आलियानं दिलं आहे. रणबीर आणि आलिया दोघंही २०२० पर्यंत लग्न करतील अशा चर्चा आहेत. आलिया- रणबीरच्या नात्याला दोन्ही कुटुंबीयांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे अनेकदा आलिया रणबीरच्या कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करताना दिसते.
मे २०१८ मध्ये अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात आलिया- रणबीर जोडपं पहिल्यांदा समोर आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा आहे. एका मुलाखतीत रणबीरनं आलियावरचं आपलं प्रेमही मान्य केलं होतं. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून हे दोघंही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 11:12 am