भारतीय सिनेसृष्टीत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या कपूर घराण्यातल्या एव्हरग्रीन व्यक्तीमत्वाने अर्थात ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषी कपूर यांना आदरांजली वाहिली. तर काहींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यामध्येच रणबीर कपूरची प्रेयसी आणि अभिनेत्री आलिया भट हिच्या भावनांचा बांध फुटला असून तिने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

ऋषी कपूर यांचं निधन झाल्यापासून आलिया कपूर कुटुंबासोबत होती. त्यानंतर तिने रात्री उशिरा पोस्ट शेअर केली. “या सुंदर व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीविषयी मी काय बोलू, त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी आल्या. आज प्रत्येक तरुण ऋषी कपूर यांच्याविषयी चर्चा करताना दिसतोय. आमची ओळख आजची नाहीये. मी फार आधीपासून त्यांना ओळखते. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांना जवळून ओळखण्याची संधी मिळाली. ते एक चांगले मित्र होते, चायनीज फूडलव्हर होते, सिनेमा लव्हर,एक लढवय्ये, एक लीडर,एक उत्तम कथाकार, ट्विटरपासून प्रत्येक गोष्टींत पॅशन होती. ते एक उत्तम वडील होते, या सगळ्यां भूमिकांमध्ये मी त्यांना पाहिलं आहे. या दोन वर्षांमध्ये त्यांनी माझ्यावर जे प्रेम केलं ते मी आजन्म विसरणार नाही. त्यांना ओळखण्याची संधी मिळाली यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानते”, असं आलियाने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt) on

पुढे ती म्हणते, “ते कायम चाहत्यांशी जोडलेले होते. त्यामुळे आज अनेक जणांना ते त्यांच्याच कुटुंबातील वाटायचे. त्यांनी कायम साऱ्यांशी असंच नातं ठेवलं. त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखं वाटत असेल. लव्ह यू ऋषी काका. तुम्ही कायम माझ्या स्मरणात रहाल. तुमचे मनापासून धन्यवाद”.

दरम्यान, ‘मेरा जोकर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ऋषी कपूर यांनी कलाविश्वात त्यांच्या अभिनयाचा अमिट ठसा उमटविला होता. आजवरच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस चित्रपटांमध्ये काम केलेल्या ऋषी कपूर हे ‘द बॉडी’ या चित्रपटात अखेरचे झळकले होते. ३० एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी सैफ अली खान, करीना कपूर खान, अभिषेक बच्चन, आलिया भट यासारखे अनेक कलाकार उपस्थित होते.