रविवारी संध्याकाळी तुम्हाला जर रेल्वे स्थानकावर हिजाब घातलेली आलिया भट्टसारखी दिसणारी मुलगी बसलेली दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ती आलियासारखी दिसणारी मुलगी नसून खुद्द आलियाच आहे. सर्वसामान्य मुलीच्या वेशात आलिया मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर बसली होती. तिच्या आगामी ‘गली बॉय’ सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. या सिनेमात ती एका मुस्लिम मध्यमवर्गीय मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे.

‘गली बॉय’ सिनेमात तिच्यासोबत रणवीर सिंगही दिसणार आहे. या सिनेमाचे अधिकतर चित्रीकरण मुंबईतील झोपडपट्टी परिसरात झाले आहे. या सिनेमातील एक दृश्य मुंबईतील रेल्वे स्थानकांवर चित्रीत करायचे होते. पण सोमवार ते शनिवार मुंबईची लाइफ लाइन असलेली रेल्वे सदैव हाऊसफुल्ल असल्याने चित्रीकरण करायचे तरी कसे हा सर्वात मोठा प्रश्न गली बॉय टीमच्या समोर होता. पण यावर तोडगा म्हणून टीमने रविवारी चित्रीकरण करायचे ठरवले.

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या या सिनेमातील चित्रीकरणाचे सेटवरचे फोटो शेअर झाले होते. पुढच्यावर्षी १४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणवीर आणि आलियासोबत कल्की कोचलिनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सिनेमात रणवीर एका रॅपरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाच्या नावावरुन तरी सध्या सिनेमाबद्दल कोणतेही अंदाज बांधणे कठीण आहे.

झोया अख्तरच्या या सिनेमाच्या निमित्ताने रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच एका सिनेमात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या दोन्ही कलाकारांचा उत्साह आणि एकंदर त्यांच्या अभिनयाची शैली पाहता त्यांच्या भूमिका हे दोघेही चांगलीच वठवतील यात शंका नाही. रणवीर सिंगने याआधीही झोया अख्तरसोबत ‘दिल धडकने दो’ या सिनेमात काम केले होते. पण, झोयाच्या दिग्दर्शनात काम करण्याची आलियाची ही पहिलीच वेळ आहे.