राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला करोना झाल्याचे समोर आले आहे. सध्या आलिया होम क्वारंटाइन आहे.

आलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत करोना चाचणी पाझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. तुम्ही देखील तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा’ या आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.

आणखी वाचा : माधुरीच्या ‘डान्स दीवाने’ सेटवर करोनाचा उद्रेक, १८ जण पॉझिटिव्ह

काही दिवसांपूर्वी आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांच्या पाठोपाठ आता आलिया भट्टची देखील करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण आढळून येत असल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. काल १ एप्रिल रोजी राज्यात ४३ हजार १८३ नवीन करोनाबाधित वाढले असून, २४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील मृत्यू दर १.९२ टक्के आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.