बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला आहे. सुशांतच्या चाहत्यांनी स्टार किड्स आणि चित्रपट निर्माता करण जोहर यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘सडक २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यामुळे सोशल मीडियावर ट्रेलवर डिसलाइकचा भडिमार करण्यात आला असून अभिनेत्री आलिया भट्टाल ट्रोल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी आलियाने ट्रोलिंगला कंटाळून तिचा कमेंट बॉक्स सगळ्यांसाठी बंद केला होता. त्यामुळे आता चाहत्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे. एका यूजरने ‘आलिया तू तुझं केमेंट सेक्शन बंद केले आहेस.. तुला आमचे मत जाणून घ्यायचे नाही आणि आम्ही तुझा चित्रपट पहायाला जायचे? असं कसं चालणार’ असे म्हणत सुनावले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने किती निराशाजनक ट्रेलर आहे असे म्हटले आहे.

यापूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हा ‘सडक २’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. आता ट्रेलर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी पुन्हा आलिया भट्ट, महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘सडक २’ या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. या चित्रपटाच्या तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रत्येक भूमिकांची ओळख करण्यात आली असून कथेची झलक पाहायला मिळते. या चित्रपटात पूजा भट्ट, आलिया भट्ट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर दिसणार आहेत. संजय दत्तच्या आयुष्यातील सर्वांत प्रिय व्यक्तीचा (पूजा भट्ट) मृत्यू होतो आणि त्यानंतर त्याचा जगण्यातला रस निघून जातो. अशातच त्याच्या आयुष्यात आर्या (आलिया भट्ट) एक नवीन उमेद घेऊन येते.