दिग्दर्शक महेश भट्ट यांचा ‘सडक’ हा बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट आहे. या हिट चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी होते. ‘सडक २’ या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. तसेच या चित्रपटाची निर्मिती मुकेश भट्ट यांनी केली आहे. आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

मुकेश भट्ट यांनी नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सडक २ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. ‘करोनाचा संसर्ग होत असलेल्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये चित्रपटगृह उघणार असे तुम्हाला वाटते का? आणि जरी सुरु झाली आणि सडक २ प्रदर्शित केला तर प्रेक्षक तो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जातील? प्रत्येकाला आपल्या कुटुंबीयांची काळजी आहे’ असे त्यांनी म्हटले.

‘सध्याच्या परिस्थितीने मला सडक २ डिजिडट प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास भाग पाडले आहे. हा एकच पर्याय आहे माझ्याकडे’ असे मुकेश भट्ट यांनी पुढे म्हटले आहे.

‘सडक’ चित्रपटात अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होती आणि आता ‘सडक’च्या सिक्वेलमध्ये देखील पूजा महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा भट्टसह आलिया देखील चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्यावेळी चित्रपटात संजय दत्तची भूमिका ३२ वर्षांच्या व्यक्तीची होती आणि आता सडकच्या सिक्वेलमध्ये संजय दत्त ५४ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे.

यापूर्वी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुरानाचा गुलाबो सिताबो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच लवकरच अभिनेत्री विद्या बालनचा शकुंतला देवी, जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना, सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा हा चित्रपट देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.