सिनेगायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या २६६ लोकांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी साठहून अधिक नमुने तपासले गेले आणि त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या २६६ लोकांपैकी जर कोणात करोना विषाणूची लक्षणे दिसली तर आणखी नमुने तपासले जातील, असंही ते म्हणाले.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे सुपुत्र दुष्यंत सिंह, उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह, माजी केंद्रीय मंत्री जतिन प्रसाद आणि त्यांच्या पत्नी नेहा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. “कनिकाच्या संपर्का आलेल्या संपूर्ण भारतातील २६६ जणांचा शोध आम्ही घेतला आहे. यामध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. साठहून अधिक नमुने तपासले गेले आहेत आणि सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तिने भेट दिलेल्या सलूनचीही तपासणी आम्ही केली”, अशी माहिती स्टेट सर्व्हिलन्स ऑफिसर विकासेंदू अगरवाल यांनी दिली.

आणखी वाचा : ‘प्रश्न आजचा न्हाई बाबा.. रोजचा हाय’; ‘धुरळा’च्या दिग्दर्शकाची मार्मिक कविता

लंडनहून परतलेली गायिका कनिका कपूर ही लखनौमध्ये दोनशे जणांच्या उपस्थितीत झालेल्या मेजवानीत सहभागी झाली होती. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेतला गेला. कनिका कपूर ९ मार्च रोजी मुंबईला परतली. त्यानंतर ती लखनौला गेली. मुंबई विमानतळावर आपण प्रशासनाला पूर्ण सहकार्य केल्याचा दावा तिने केला. लागण झाल्याची बाब लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने फेटाळला आहे. तिला लखनौमधील रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले असून तिच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.