अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने केलेले सगळे आरोप चुकीचे आणि खोटे आहेत असं त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी म्हटलं आहे. दहा वर्षांपूर्वी हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला. #MeToo या चळवळीसंदर्भात जेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. तसेच राज्य महिला आयोगाकडे या संदर्भात दाद मागितली होती. राज्य महिला आयोगाने या संदर्भात नाना पाटेकरांना नोटीस बजावली होती. या नोटीशीला उत्तर देतानाच हे सगळे आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचे नाना पाटेकरांच्या वकिलांनी म्हटले आहे. तनुश्री दत्ताने केलेले आरोप आणि सत्य यांच्यात खूप अंतर आहे. जे आरोप तिने केले आहेत त्यांना काहीही अर्थ नाही असं नोटीशीला दिलेल्या उत्तरात निकम यांनी म्हटले आहे.

हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर एका आयटम साँगचे शुटिंग होते. यादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला. मीटू या चळवळीत तिने तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. मात्र अभिनेते नाना पाटेकर यांनी हे सगळे आरोप खोडून काढले. हे प्रकरण दहा वर्षांपूर्वीचे आहे, त्याचवेळी मी यासंदर्भात खुलासा केला होता. एखाद्या प्रकरणाला दहा वर्षे झाली म्हणजे सत्य कसे बदलेल? असा प्रश्न नाना पाटेकरांनी विचारला होता. तसेच अवघ्या काही क्षणांची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा विषय संपवला होता.

तनुश्री दत्ताने हे प्रकरण लावून धरले तिने या संदर्भात पुन्हा पोलिसातही तक्रार केली आणि त्यानंतर तिने राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली. राज्य महिला आयोगाने तिच्या तक्रारीची दखल घेऊन त्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांना नोटीस बजावली. या नोटीशीला नाना पाटेकर यांचे वकील अनिकेत निकम यांनी उत्तर दिले. ज्यामध्ये तनुश्रीने केलेल्या आरोपांना काहीही अर्थ नाही ते सगळे आरोप चुकीचे आहेत असे त्यांनी म्हटले आहे. आता यानंतर तनुश्री दत्ता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.