ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरलीये. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन प्रमुख व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना प्रेक्षकांनाही मजा येतेय त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. पाहता पाहता या मालिकेने ४०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.

या ४०० भागांच्या प्रवासात अनेक नवीन व्यक्तिरेखांची मालिकेत एण्ट्री झाली ज्यामुळे मालिकेबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अजूनच वाढली. नचिकेतची मैत्रीण कादंबरी म्हणजेच कॅडी. कॅडीच्या भूमिकेत अभिनेत्री पूजा बिरारी प्रेक्षकांच्या भेटीस आली. सईच्या डान्स टीचरच्या भूमिकेत फुलवा खामकर, तसेच अभिनेता तेजस बर्वे हा अजिंक्यच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला. नुकतीच मालिकेत एण्ट्री झाली ती म्हणजे नचिकेतच्या आईची जिची भूमिका अभिनेत्री प्रिया मराठे साकारताना दिसत आहे. तिला इम्प्रेस करण्यासाठी सईने देखील आता नवीन रूप धारण केलं आहे. सई आता जाई जोशी म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एकाच मालिकेत इतके सगळे रंजक ट्विस्ट्स प्रेक्षकांना पाहायला मिळत असल्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. ४०० भाग पूर्ण केल्याचा आनंद या मालिकेच्या संपूर्ण टीमने जंगी पार्टी करून साजरा केला.

या मालिकेचे निर्माते सोहम बांदेकर आणि आदेश व सुचित्रा बांदेकर यांनी मिळून मालिकेतील संपूर्ण टीमला हे सरप्राईज दिलं तसंच या आनंदाच्या क्षणी मालिकेत काम करण्याऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागच्या सदस्याला एक मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला. ही मालिका पुढेही असंच प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करत राहील असे आश्वासन यावेळी आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांनी यावेळी दिलं.

या आनंदाच्या क्षणी अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणाली, “नुकतेच ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेचे ४०० भाग पूर्ण झाले आहेत. मी हा आनंद शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे. माझी पहिलीच मालिका आणि त्या मालिकेने ४०० भाग पूर्ण केले ही खूपच आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी. आम्हाला शूटिंग करताना खूप मजा येते. २ वर्ष झाले आम्ही कलाकार आणि संपूर्ण टीम एकत्र काम करतोय आणि या ४०० भागांच्या प्रवासात आम्ही कामासोबतच खूप धमाल मस्ती देखील केली, खूप आठवणी आहेत या संपूर्ण प्रवासाच्या. प्रेक्षकांचं आमच्यावरचं प्रेम पाहून आम्ही सर्वचजण खूप भारावलो आहोत. प्रेक्षकांना यापुढे देखील मालिकेत अजून नवीन आणि रंजक गोष्टी पाहायला मिळतील. त्यामुळे आमच्यावर असंच प्रेम करत राहा.”

या आनंदाच्या क्षणी आदेश बांदेकर म्हणाले, “४०० भागांचा प्रवास हा तितका सोपा नव्हता पण संपूर्ण टीमने मिळून सकारात्मकतेने काम करून ही मालिकाच यशस्वी केली नाही तर ४०० भागांचा टप्पा देखील गाठला याचा मला खूप आनंद आहे. ज्यांच्यामुळे ही मालिका आज यशाच्या शिखरावर आहे त्यांचा या क्षणी गौरव आणि सन्मान हा झालाच पाहिजे आणि म्हणूनच आम्ही मालिकेच्या सेटवर हा सेलिब्रेशनचा घाट घातला.”