पुण्यातील युवा रंगकर्मी आणि प्रयोगशील अभिनेता-दिग्दर्शक आलोक राजवाडे प्रतिष्ठेच्या ‘फोब्र्ज इंडिया’ मासिकाच्या यादीत झळकला आहे. ‘फोब्र्ज इंडिया- थर्टी अंडर थर्टी’ यादीत देशातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या ‘आश्वासक ३०’ तरुणांचा अंतर्भाव आहे. ‘रंगभूमी’ या क्षेत्रासाठी २७ वर्षांच्या आलोकचं नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. युवा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याच्या पाठोपाठ सलग दुसऱ्या वर्षी आलोक राजवाडे हा पुणेकर तरुण रंगकर्मी ‘फोब्र्ज’मध्ये झळकला आहे. त्यानिमित्तानं आलोक राजवाडे याच्याशी चिन्मय पाटणकर यांनी साधलेला हा संवाद..

* ‘फोब्र्ज’सारख्या मान्यवर संस्थेने केलेल्या देशातील ‘आश्वासक ३० तरुणां’च्या यादीत तुझं नाव समाविष्ट केलं गेलंय. त्याबद्दल तुझी काय भावना आहे?’

नाटकातील कामामुळे माझं नाव समाविष्ट केलं गेलं आहे याचा मला विशेष आनंद वाटतो. कारण गेली आठ-दहा र्वष मी चित्रपटांशीही संबंधित आहे. नाटक करणं, विशेषत: दिग्दर्शन करणं हा माझा िपड आहे. नाटक ही समूह कला आहे. त्यामुळे आजवरची वाटचाल मी एकटय़ानं केलेली नाही. ‘जागर’, ‘समन्वय’, ‘आसक्त’, ‘नाटक कंपनी’ या नाटय़संस्था आणि या संस्थांतील मित्र व सहकारी, ज्येष्ठ दिग्दर्शक अतुल पेठे, अतुल कुमार या सर्वाकडून मला सदैव प्रेरणा मिळत आली आहे. त्या जोरावरच माझं काम सुरू आहे. माझं नाव या यादीत येण्यामागे या सर्वाचा सहभाग व सहकार्य कारणीभूत आहे.

*  ‘फोब्र्ज हे नाव विशेषत: उद्योगजगतासाठी प्रख्यात आहे. नाटकासारख्या तुलनेनं खूप छोटय़ा क्षेत्राचा या यादीसाठी विचार होणं.. त्यातून मराठी प्रायोगिक रंगभूमीशी संबंधित तरुणाच्या नावाचा विचार होणं तुला किती महत्त्वाचं वाटतं?’

नक्कीच महत्त्वाचं आहे. एकूण भारताच्या तुलनेत मराठी प्रायोगिक नाटकाचं क्षेत्र अजूनही खूप छोटं आहे. त्यात व्यावसायिकता आलेली नाही. मला असं वाटतं, आम्ही मित्रांनी मिळून सुरू केलेली ‘नाटक कंपनी’ ही संस्था आणि त्याद्वारे नाटकांची निर्मिती करणं याचाही विचार निवड समितीनं केला असावा. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. त्यामुळे नाटक करताना आम्ही अर्थकारणाचा विचार करतोच. प्रायोगिक नाटकातून पसे मिळणं शक्य नसलं, किंवा त्यातून पसे मिळवायचे नसले, तरी किमान ते तोटय़ात जाऊ नये, हा प्रयत्न असतोच. त्याची काळजी आम्ही नाटक करतानाही घेतो. त्याचं एक प्रारूप आम्ही निर्माण केलं आहे. नाटक करणं हा एक प्रकारे उद्योगच आहे.

*‘आताच्या बहुमाध्यमांच्या काळात प्रायोगिक नाटकाकडे कसं पाहायला हवं?’

यासंदर्भात मला काही गोष्टींचा खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज वाटते. अतुल पेठे ज्या पद्धतीने नाटकाचा विचार करतात, तो दृष्टिकोन मला महत्त्वाचा वाटतो. त्यांच्यासह ‘आषाढातील एक दिवस’ हे नाटक करताना जवळून त्यांचा विचार पाहता आला. त्यांच्या दृष्टीने नाटक करणं ही सर्जनशील प्रक्रिया आहे. आणि नाटक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं ही जनसंपर्काची प्रक्रिया आहे. या दोन्हीचा एकत्रित विचार केला तरच नाटक समाजापर्यंत पोहोचू शकेल. ते पेठे यांना नेमकेपणानं साध्य झालं आहे. त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटक करताना समकालीन भान जपणंही गरजेचं आहे. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटनांचे पडसाद आपल्या कलाकृतींतून उमटले पाहिजेत, तरच ती कलाकृती दखलपात्र, महत्त्वाची होऊ शकेल. परिस्थितीपासून पळून जाऊन चालणार नाही. अजून एक महत्त्वाचं म्हणजे परंपरेला प्रश्न विचारले पाहिजेत. आपण डोळे झाकून परंपरा चालवण्यात काहीच अर्थ नाही. आपलं म्हणणं ठासून मांडलं पाहिजे. त्याविषयीचं आपलं आकलन मांडलं पाहिजे. हे सगळं करताना आपली कलाकृती ही स्वत:ची आणि नव्या जाणिवा मांडणारी हवी. त्यात उचलेगिरी करून चालणार नाही.

chinmay.reporter@gmail.com