युवा रंगकर्मी आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेला आलोक राजवाडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलोकच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ असं असून आलोक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची मुंबई फिल्म फेस्टीव्हल २०१८ साठी निवड करण्यात आली आहे.

आलोकने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली असून आलोक बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांसाठी पुन्हा काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाची कथा धर्माधिकारी सुमंत यांनी लिहीली असून ते देखील पुन्हा एकदा सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अभय महाजन प्रमुख भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री पर्ण पेठे त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

दरम्यान, आलोकने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच अनेक चित्रपटाच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘तिची सात प्रकरणं’, ‘गेली एकवीस वर्ष’, ‘दिल -ए-नादान’, ‘नाटक नको’ यासारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे आता आलोक पुन्हा एकदा ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.