चित्रपटसृष्टी आणि कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच तत्पर असतात. ‘दंगल’ या चित्रपटाने मोठ्या उत्साहात २०१६ या वर्षाची सांगता झाली. सरत्या वर्षाला ‘दंगल’मय मिरोप देत जल्लोषात २०१७ चे स्वागत झाले. त्यामुळे आमिरच्या चित्रपटाने भारावलेल्या प्रेक्षकांचे लक्ष आता लागले आहे ते म्हणजे या वर्षाच्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांकडे. २०१७ मध्ये जानेवारी महिन्याचा सुरुवातीच्या आणि शेवटच्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांसाठी चित्रपटांची मेजवानी असणार आहे. या महिन्यात ‘झाला बोभाटा’, ‘ती सध्या काय करते’ या मराठी चित्रपटांसोबतच किंग खानचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबिल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चला तर मग थोडक्यात जाणून घेऊया या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल..

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असतं. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं आपल्या सोबत असतं, मनातल्या कोपऱ्यात लपलेलं ! त्या खास व्यक्तिबद्दल नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात असते आणि एक प्रश्न मनात येतो की ती किंवा तो सध्या काय करत असेल ? ह्या उत्सुकतेला घेऊनच झी स्टुडीओजचा आगामी मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे ‘ती सध्या काय करते’. हा चित्रपट येत्या ६ जानेवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे तसेच झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ फेम आर्या आंबेकर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.

tskk

‘ती सध्या काय करते’ या चित्रटपटासोबतच आणखी एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट  म्हणजे ‘झाला बोभाटा’. अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला बोभाटा’ या चित्रपटाने सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे. मराठी चित्रपटांमध्येही विविध प्रयोग करण्याला प्राधान्य दिले जात आहे, याचाच प्रत्यय या चित्रपटातून प्रेक्षकांना येऊ शकतो. हा चित्रपट एका गावावर आणि तिथे घडणाऱ्या काही प्रसंगावर भाष्य करणारे कथानक या चित्रपटात साकारण्यात आले आहे. दिलीप प्रभावळकर या चित्रपटामध्ये एका वेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आभिनेता दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत, दिपाली आंबिकार, तेजा देवकर, मयूरेश पेम, मोनालिसा बागल, रोहित चव्हाण हे कलाकार झळकणार आहेत.

zala-bobhata

या दोन मराठी चित्रपटांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तो म्हणजे शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट. या चित्रपटामध्ये शाहरुख खान एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘रईस’ हा चित्रपट गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती चित्रपटाचे कथानक फिरताना दिसणार आहे. शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.

raees-shahrukh-khan

शाहरुखच्या ‘रईस’ला टक्कर देण्यासाठी २५ जानेवारीला आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे हृतिक रोशचा ‘काबिल’. अंधत्व काय असते याची कल्पना अनेकजण करुही शकत नाहीत. पण, अंध व्यक्तिंच्या भावनांचा विचार करता त्यांच्याबद्दल नेहमीच अनेकांना सहानुभूती असते. याच अंधत्वाचा अनुभव घेत अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या ‘काबिल’ या चित्रपटामध्ये एक अंध व्यक्तिरेखा साकारली आहे. हृतिकच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. ‘काबिल’ या चित्रपटामध्ये हृतिक आणि यामी दोघेही अंध व्यक्तिरेखा साकारत आहेत. राकेश रोशन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. त्यामुळे आता प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

kaabil-759