ट्विटरवर अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींना ट्रोलिंगचा सामना करावा लागते. कधी सेलिब्रिटींनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोल केले जाते तर कधी अगदी सहजपणे त्यांच्या आवडीनिवडी सांगितल्यामुळेही त्यांना ट्रोल केले जाते. असेच कहीसे गायक आणि संगीतकार अमाल मलिकसोबत झाले आहे.

अमाल खानने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटाची गाणी कंपोज करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सलमानने अमालला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. पण एका मुलाखतीमध्ये अमालने तो शाहरुख खानचा चाहता असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता सलमान खानच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर टीका करणाऱ्या सलमानच्या फॅन्सला त्याने उत्तर दिले आहे. त्याने सलमानच्या अनेक चाहत्यांना उत्तर दिल्यामुळे अमाल मलिक आणि सलमानचे फॅन्स यांच्यामध्ये ट्विटरवॉर सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

‘आज लोकांना समजले की अशिक्षित लोकांची विचारसरणी कशी आहे. हे सगळं शाहरुख माझा आवडता अभिनेता आहे हे सांगितल्यानंतर सुरु झालं आहे. मी सलमानचा आदर करतो. त्याने मला लाँच केले आहे. याचा अर्थ असा नाही की त्याचे चाहते मला वाटेल ते बोलतील’ या आशयाचे अमालने ट्विट केले आहे. त्यानंतर ही ट्रोलर्सने त्याला ट्रोल केले.

अमालने आणखी एक ट्विट करत राग व्यक्त केला आहे. ‘हे पाहून चांगलं वाटलं की लोकं माझं ट्विट रिपोर्ट करतायेत आणि स्वत:चं डिलिट करतायेत. आशा करतो यातून लोकांना काही शिकायला मिळेल. तुम्ही कोणालाही त्यांच्या आवडीनिवडी बदलण्यास सांगू शकत नाही. तुमच्या आवडनिवडी वेगळ्या आहेत आणि माझ्या वेगळ्या आहेत. हे किती वेळा सांगावे लागेल माहित नाही. लोकांना अपमान झाला तरी कळत नाही’ या आशयाचे त्याने ट्विट केले आहे.

त्यानंतर अमालने त्याचे ट्विटर अकाऊंट हॅक झालेले नाही असे म्हणत हसण्याचे इमोजी वापरले आहेत.

त्यावर एका यूजरने ट्विट करत ‘अमाल मलिक तुझे वागणे पाहून आश्चर्यचकित झाले. मुलींसाठी देखील अशा भाषेचा वापर. तू ट्रोलर्स पेक्षाही घाणेरडी भाषा वापरली आहेस. कधी कोणत्या सेलिब्रिटीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा प्रकाराची अॅक्टिवीटी करताना पाहिले नाही. तुला फक्त सर्वांचे लक्ष वेधून घ्याचे आहे का? लाज वाटली पाहिजे तुला’ असे म्हटले आहे.