पूर्वी कधीतरी वाचनात आलं होतं, की अवकाशातील कुठल्याशा ग्रहावरून पृथ्वीवर प्रकाशलहरी पोहोचायला तब्बल चारशे वर्षे लागतात. म्हणजे त्या ग्रहाकरता पृथ्वीवरचा काळ चारशे वर्षे मागे आहे. त्यावेळी मनात आलं होतं- की असं जर असेल, तर पृथ्वीवर घडलेल्या घटना-घडामोडी त्या ग्रहापर्यंत पोहोचायलाही चारशे वर्षे लागत असणार. म्हणजे त्या ग्रहावरील लोकांच्या (असलेच तर!) दृष्टीने पृथ्वीवर शिवाजीमहाराज अजूनही जन्माला यायचे आहेत! भन्नाटच!!

ही गोष्ट आठवायचं कारण- ‘सुबक’ निर्मित, मनस्विनी लता रवींद्र लिखित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक! काहीसं वर उल्लेखल्याप्रमाणेच विषयबीज घेऊन हे नाटक रचलेलं आहे. आजच्या काळातला- २०१६ सालातला कुणी एक तरुण आणि कुणी एक तरुणी जर कालयंत्रसदृश गोष्टीच्या साहाय्याने वर्तमानाच्या ४०-५० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ मागे जाऊ शकले तर त्यांना काय अनुभवास येईल? म्हटलं तर हा तसा नजीकचाच भूतकाळ. वाचनातून, ऐकीव किंवा कदाचित काही कानी पडल्याने त्यांना माहीतही असू शकेल असा. किंवा अगदी समजा नसला माहीत; तरी इंटरनेटच्या साहाय्यानं त्या काळातल्या घटना-घडामोडी ते आज नक्कीच जाणून घेऊ शकतात असा. तर.. आजच्या काळातल्या माणसांना प्रत्यक्षपणे सदेह भूतकाळात जाता आणि जगता आलं तर..? तर काय बहार येईल! कारण त्यांना भविष्यात जे काही घडणार आहे (जे आधीच घडून गेलेलं असल्याने) माहीतच असेल. पण त्या काळातल्या माणसांना मात्र आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय, हे माहीत नसेल. त्यांना २०१६ सालातून (म्हणजे वर्तमानातून) त्यांच्या काळात आलेल्या या माणसांकडून त्यांचं भविष्य, त्यांच्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटना-घडामोडी जाणून घेता आल्या तर त्यांना काय वाटेल? त्यांना या भविष्यवाणीचा फायदा होईल? की त्यांच्या जगण्यातली गंमतच निघून जाईल? अनिश्चित भविष्यामुळेच तर माणूस स्वप्नं बघू शकतो. उद्याच्या आशेवरच तर आजचे कष्ट आणि वेदना तो सोसत असतो. पण पुढे (भविष्यात) एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल, तर ते आधीच कळल्याने तो माणूस कदाचित त्याक्षणीच कोसळून पडेल. किंवा एखाद्याचं भवितव्य जर उज्ज्वल होणार असेल तर त्याला ते आधीच कळल्याने तो निर्धास्त होईल आणि त्यासाठी घ्यावयाचे कष्टच करणार नाही. ‘आहेच माझा हरी, तो देईल खाटल्यावरी’ असं म्हणत निवांत राहील. आपला भविष्यकाळ आधीच कळला तर माणसं त्यांच्या हातून घडणाऱ्या (संभाव्य) चुका कसोशीने टाळतील. परिणामी त्यांचं आयुष्य चुकाविरहित, सरधोपट आणि अळणी होऊन जाईल. कालयंत्राद्वारे मागे जाता आलं तर जगाचा इतिहास घडवणाऱ्या किंवा बिघडवणाऱ्या व्यक्तींना वेळीच रोखता येईल. आणि मग त्यांच्या करणीतून घडणारा/ बिघडणारा इतिहासही कोणतीच अनुचित घटना न घडता कळाहीन बनेल.. कालयंत्र (‘टाइम मशिन’) या संकल्पनेत असं बरंच काही घडू शकतं. अनेकानेक शक्यता या संकल्पनेच्या गर्भात अंतर्भूत आहेत. तर ते असो.

Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा
surya grahan 2024
५४ वर्षांनंतर लागणार पूर्ण सुर्यग्रहण! या ३ राशींचे नशीब चमकणार; करिअरमध्ये होईल प्रगती, कमावतील भरपूर पैसा
nata exam 2024 nata exam for architecture admission
प्रवेशाची पायरी : आर्किटेक्चर प्रवेशासाठी नाटा परीक्षा

‘अमर फोटो स्टुडिओ’मध्ये अपू आणि तनू या प्रेमिकांच्या बाबतीत आधुनिक काळाचे आजार त्यांना झालेत.. म्हणजे नैराश्य, अनिश्चित भविष्याच्या चिंतेतून येणारी असुरक्षिततेची भावना, नात्यांतल्या वैय्यर्थ्यांची दुखरी जाणीव, सततच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे उरीपोटी धावताना येणारा कमालीचा थकवा आणि त्यापायी आयुष्य खऱ्या अर्थानं जगायचंच राहून जाणं, वगैरे वगैरे. शिवाय भूतकाळ आणि त्यातल्या माणसांचं ओझंही असतंच मानगुटीवर. या नाना आजारांनी संत्रस्त झालेल्या या दोघांचं नातंही शिळं झालंय. त्यात साचलेपण आलंय. त्यातला रोमान्स संपलाय. ते तुटण्याच्या मार्गावर आहे. विशेषत: अपूच्या बाबतीत. त्याला त्याच्या घराण्यातील पुरुषांचा भूतकाळ कुरतडतोय. त्याचे वडील, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा असे सगळे पुरुष वयाच्या २७ व्या वर्षी घर सोडून निघून गेलेत. अन् पुन्हा ते माघारी आलेच नाहीत. तोही आता २७ वर्षांचा झालाय. त्यामुळे आपणही असेच गायब होणार असं त्याच्या मनानं घेतलंय. त्यापेक्षा आत्महत्या करून स्वत:ला संपवून टाकावं असं त्याला वाटतंय. म्हणजे ही साखळी तरी तुटेल. म्हणून तो गळफास लावून आत्महत्या करण्याची तयारी करतोय. आणि दुसरीकडे मोबाइलवर आपलं अखेरचं हृद्गत तनूसाठी चित्रित करतोय. इतक्यात तनूच तिथं येते आणि त्याचा आत्महत्येचा प्लॅन चौपट होतो.

खरं तर अपूला रीसर्चसाठी विदेशी स्कॉलरशिप मिळालीय. त्याकरता व्हिसासा ठी लागणारे फोटो काढण्यासाठी त्याला जायचंय. पण ते न करता तो हे भलतंच काहीतरी करताना बघून तनू जाम वैतागते. ती त्याला ‘मुकाट फोटो काढायला चल’ म्हणून दमच भरते. पण तो परदेशात गेल्यावर आपली ‘लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप’ टिकणार नाही, त्यामुळे आपण परस्परांना बाय-बाय करूया असं ती अपूला सांगते. त्याने अपू आणखीनच निराश होतो. त्याचा जगण्यातला उरलासुरला रसही संपतो.

पण तनू त्याला जबरदस्तीने ‘अमर फोटो स्टुडिओ’त घेऊन जाते. पण तिथला म्हातारा फोटोग्राफर फोटो काढण्याऐवजी त्यांच्यासमोर तत्त्वज्ञानाचे तारेच तोडू लागतो. म्हाताऱ्याची सटकलीय असं म्हणून दोघंही तिथून निघून जाऊ इच्छितात. तेव्हा म्हातारा त्यांना फोटोसाठी स्टुडिओतल्या निरनिराळ्या देखाव्यांसमोर उभं करतो आणि त्यांचे फोटो क्लिक् करतो. त्याक्षणी ते भलत्याच काळात जाऊन पोहोचतात.

अपू १९४२ सालात.. एका चित्रपट स्टुडिओत.

तर तनू १९७६ सालात.. चरसी हिप्पींच्या अड्डय़ावर.

आणि इथून सुरू होतो दोघांचा एक अद्भुत, अविश्वसनीय प्रवास! म्हणजे त्यांची जाणीव आहे वर्तमानातली; पण ते गेलेत मात्र भूतकाळात.. त्यावेळच्या जगात. तिथली माणसं त्यांना अपरिचित आहेत. त्याकाळचं त्यांचं जगणं कानावरून गेलं असलं, थोडंफार माहीत असलं, तरी त्या माणसांना ते प्रत्यक्षात जगताना पाहायचा विलक्षण अद्भुत अनुभव ते घेतात. त्यातून त्यांच्या संवेदनेला वेगवेगळे प्रश्न पडतात. आपलं जगणं आणि त्याकाळच्या माणसांचं जगणं यांचा कुठंतरी परस्परसंबंधही जुळताना त्यांना आढळतो. त्यांचे प्रश्न आणि आपले प्रश्न यांचा ताळमेळ लागत नसला, तरी त्यांच्या आयुष्यात काहीएक प्रयोजन होतं, त्यांना त्यांची अशी काही मूल्यं होती, त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची त्यांची वृत्ती होती. आपल्या काळातले प्रश्न, समस्या कालौघात अधिक जटिल, गुंतागुंतीच्या झालेल्या असल्या, तरी मानवी मूल्यं कुठल्याही काळात फारशी बदलत नसतात, याचा साक्षात्कार अपू आणि तनूला या कालप्रवासात होतो. ही नवी, प्रगल्भ जाणीव घेऊन एका क्षणी ते वर्तमानात परततात.. परस्परांना समजून घेताना त्यांना आता झगडावं लागणार नाही- हा विश्वास घेऊन!

मनस्विनी लता रवींद्र यांचं ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक त्यांच्या याआधीच्या व्यक्तिगत अनुभवांचा पैस मांडणाऱ्या नाटकांकडून अधिक परिपक्व जाणिवांकडे जाणारं आहे. माणसाचं जगणं समजून घेण्याचा.. त्यातही आजचं भीषण गुंतागुंतीचं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न यात त्यांनी केलेला आहे. त्यासाठी त्यांनी योजलेला फोटो स्टुडिओरूपी कालयंत्राचा डिव्हाइस विलक्षण नजाकतीनं त्यांनी नाटकात खेळवला आहे. यात अर्थातच दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, तंत्रज्ञ व कलावंतांचाही तितकाच महत्त्वपूर्ण वाटा आहे. व्यावसायिक रंगभूमीवर असं वेगळ्या जॉनरचं नाटक सहसा बघायला मिळत नाही. आजच्या तरुणाईनं तरुणांसाठी केलेलं हे चिरतरुण नाटक आहे. तथापि त्यात थिल्लरपणा नाहीए. काळाचे वेगवेगळे  पट, त्यांची एकमेकांत होणारी सरमिसळ, त्यातून उलगडणारा वेगळाच अवकाश, आशय आणि पुनश्च त्यांचं परस्परांत वितळणं.. हे सारं फॅन्टसीच्या अंगानं ‘अमर फोटो स्टुडिओ’मध्ये येतं. म्हाताऱ्या फोटोग्राफरच्या रूपात तत्त्वचिंतनाची डुबही त्याला लाभलीय.

हा नाटय़खेळ दिग्दर्शक निपुण धर्माधकारी यांनी अत्यंत अप्रतिमरीत्या गुंफलाय. त्याचं नेमक्या शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. काळबदलाबरोबरच त्या- त्या काळाचे संदर्भ बारकाव्यानं जिवंत करण्याबरोबरच निरनिराळ्या काळांतली माणसं, त्यांची परस्परांतली गुंतणूक, त्यांच्यासमोर कालानुरूप उभे राहणारे वेगवेगळे पेच, व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्य यांतला संघर्ष आणि प्राप्त परिस्थितीशी दोन हात करताना होणारी त्यांची तगमग, ससेहोलपट आणि त्यातूनही तगलेली त्यांची चिवट जीवनेच्छा.. असा भरीव कॅनव्हास या नाटकाला लाभलेला आहे. निपुण धर्माधिकारी यांनी हे कालसापेक्ष एकेक सूक्ष्म तपशील एखाद्या कसबी, सर्जनशील कलावंताच्या प्रतिभेने प्रत्ययकारीतेने भरले आहेत. काळाचे पुढे-मागे सरकणे आणि कधी कधी तर त्यांची चक्क सरमिसळच होणे, त्याचबरोबर भिन्न काळांतील माणसांचा परस्परांशी संवाद होताना उडणारा संदर्भाचा गोंधळ व त्यातून नाटकाला मिळणारं आशयसूत्राचं सखोलपण त्यांनी अचूक पकडलेलं आहे. अपू आणि तनू भिन्न काळांत वावरत असल्याने एका क्षणी अमर फोटो स्टुडिओत समोरासमोर येऊनही ते एकमेकांना भेटू शकत नाहीत, किंवा अपूच्या वडिलांचा त्यांच्या वडिलांशी होणारा संवाद हे प्रसंग दिग्दर्शकीय हुकुमतीचं दर्शन घडवतात. रंगमंचाबरोबरच प्रेक्षागृहातही पात्रांना उतरवत काळाची अदृश्य चौकट भेदण्याचा त्यांचा प्रयोगही दाद देण्याजोगा. म्हाताऱ्या फोटोग्राफरच्या वरकरणी निर्थक वाटणाऱ्या, परंतु खूप काही सांगू इच्छिणाऱ्या बडबडीतून नाटकाची थीम पुढे पुढे सरकत राहते.

वेगवेगळ्या काळांचे संदर्भ जिवंत करणारं आणि फॅन्टसी व वास्तवाची सरमिसळ करणारं प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य या प्रकारच्या नाटकाला आवश्यक ती विश्वसनीयता बहाल करतं. नाटकातला कालबदलाचा अनवट खेळ मुळ्ये यांच्या बहुआयामी नेपथ्यामुळेच शक्य झालेला आहे. गंधार संगोराम यांनीही पाश्र्वसंगीत तसंच चपखल गीतांच्या वापरातून यातला कालपट ठाशीव केला आहे. शीतल तळपदे यांनी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट चित्रपट जमाना आणि आणीबाणीच्या अंदाधुंद कालखंडाचं सूचन प्रकाशयोजनेतून सुयोग्यरीत्या केलं आहे. कल्याणी कुलकर्णी-गुगले यांची वेशभूषा आणि संतोष गिलगिले-अभय मोहितेंची रंगभूषा नाटय़ात्म अस्सलतेवर शिक्कामोर्तब करणारी आहे. अक्षता तिखे यांचे नृत्यआरेखन आणि गायक जसराज जोशी व संहिता चांदोरकर यांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे.

हे नाटक खऱ्या अर्थानं संस्मरणीय केलं आहे ते यातल्या सळसळत्या ऊर्जेच्या तरुण कलावंतांनी. सुव्रत जोशी यांनी संभ्रमित अपूचं गोंधळलेपण, हरवलेला आत्मविश्वास, नात्यातल्या ‘अ‍ॅश्युरन्स’करताची तगमग उत्कटतेनं व्यक्त केली आहे. अपूच्या वडिलांच्या (प्रकाशच्या) भूमिकेतही त्यांनी भाषा, हावभाव, मानसिकता यांच्या बदलातून काळाचा उंबरठा सहजगत्या ओलांडला आहे. सखी गोखले यांनी वर्तमानकालीन वरपांगी स्मार्ट; परंतु जिच्या आत काहीच तीव्रतेनं पोहोचत नाही, या जाणिवेनं पोखरलेली तरुणी (तनू) यथार्थ उभी केली आहे. कालौघात मागे गेल्यावर तिला आयुष्याबद्दल खरा साक्षात्कार होतो. त्यातून वर्तमानात पुरेल इतकं संचित तिला मिळतं. पूजा ठोंबरे यांनी १९४२ सालातली चित्रपट नटी चंद्रिका हिच्या व्यक्तिगत आयुष्यातलं दु:ख, तिच्या वेदना आणि प्रेक्षकांचं रंजन करताना घेतलेला हसरा मुखवटा अशी नानाविध भावआंदोलनं लीलया पेलली आहेत. त्याचबरोबरीने सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या सुजाताचं ठाम व्यक्तित्वही तितक्याच करारीपणे वठवलं आहे. तिने साकारलेली फोटोग्राफरची बायकोही ओके. सतत तत्त्वज्ञानाच्या भाषेत बोलणारा म्हातारा फोटोग्राफर अमेय वाघ यांनी विश्वासार्हतेनं उभा केला आहे. तसंच चित्रपती व्ही. शांताराम यांचा आब व भारदस्त व्यक्तिमत्त्वही तितक्याच सहजपणे साकारलं आहे. हिप्पींचं व्यसनाधीन, घरंगळलेलं आयुष्य जगत असलेला अनंता.. आणि त्याच्या अंतरीचं दु:ख तशाच तीव्रतेनं पोचवलं आहे. सिद्धेश पूरकर यांनी नटवर्य केशवराव दातेंसह विविध भूमिकांचं बेअरिंग छान निभावलं आहे.

दीर्घकाळ सोबत करणारा नाटय़ानुभव म्हणून ‘अमर फोटो स्टुडिओ’ आपल्या स्मरणात राहील यात शंका नाही.