बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची चांगलीच नाचक्की झाली आहे. अॅमेझॉनच्या एका कॅम्पेनमध्ये स्वरा भास्करच्या सक्रीय सहभागामुळे ग्राहक आणि नेटकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे त्यामुळे जोपर्यंत अॅमेझॉन स्वराला कॅम्पेनमधून हटवत नाही तोपर्यंत हे अॅप डिलीट करण्याचा किंवा त्यावरून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याची #BoycottAmazon मोहीम सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यातून कंपनीला बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे अखेर अॅमेझॉननं स्वराचा सहभाग असलेले काही एन्डॉर्समेंट ट्विट डिलीट केले आहेत.

कठुआ बलात्कार प्रकरणात स्वरानं सोशल मीडियावर खुलेपणानं भाष्य केलं. या प्रकरणावर खुलेपणानं सोशल मीडियावर व्यक्त होणारी स्वरा ही बॉलिवूडमधली पहिली अभिनेत्री होती. ‘मी हिंदुस्थान आहे, मला लाज वाटते. ८ वर्षांच्या मुलीचा देवीच्या मंदिरातच बलात्कार होतो, खून होतो’ असं लिहिलेली पाटी हातात घेऊन तिनं विरोध केला होता. या प्रकरणात स्वरानं घेतलेली भूमिका अनेकांना खटकली. तिनं हिंदुस्थान असा उल्लेख करायला नको होता. तिनं देशाचा अपमान केला आहे, प्रतिमा मलिन केली आहे असं अनेकांनी ट्विट करत तिच्यावर टीका केली होती.

ती अॅमेझॉनच्या ‘अजनबी शहर की गुगली’ या कॅम्पेनचा भाग असल्याचं समजताच अनेकांनी अॅमेझॉनवरदेखील बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आहे. अॅमेझॉननं तिला आपल्या कॅम्पेनमधून हटवावं अन्यथा अॅमेझॉनवरून वस्तूंची खरेदी थांबवण्यात येईल अशी भूमिका नेटीझन्सनं घेतली आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अॅमेझॉनने स्वराचा सहभाग असलेले एन्डॉर्समेंट ट्विट डिलीट केले आहेत.