अ‍ॅमोझॉन प्राईम व्हिडीओने ‘तांडव’ वेब सीरिज प्रकरणी अखेर माफिनामा जाहीर केलाय. प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याबद्दल अ‍ॅमेझॉन प्राईमने सोशल मीडियावरुन माफिनामा जाहीर केलाय.

जानेवारी महिन्यात अ‍ॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘तांडव’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘तांडव’ सीरिजने मोठा वाद ओढावून घेतला होता. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी देशभरातून या सीरिजला विरोध करण्यात आला. तसचं सीरिजमधील अनेक दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला. या सीरिजला सर्व स्तरांमधून होत असलेला विरोध लक्षात घेता दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विट करत माफी मागितली. “कोणाच्या भावना दुखावण्याचा आमच्या हेतू नव्हता. पण जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो. असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली. यानंतर सीरिजमधील काही दृश्य बदलण्यात आली.

यानंतर आता अ‍ॅमेझॉन प्राईमने प्रेक्षकांची माफि मागितली आहे. एक पत्रक जारी करुन त्यांनी ही मागितली आहे. या पत्रकात म्हंटलय ” नुकत्याच रीलिज झालेल्या तांडव वेब सीरिजमधील काही दृश्य प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटली यासाठी आम्ही माफी मागतो. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही ही आक्षेपार्ह दृश्य काढून टाकत वेब सीरिज पुन्हा रिलीज केली आहे. प्रेक्षकांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक भावनांचा आम्ही आदर करतो. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दलही आम्ही क्षमस्व आहोत. आम्ही भारतीय न्याय व्यवस्थेचाही आदर करतो तसचं यापुढेदेखील आम्ही भारतीय कायद्याचं पालन करु.” असं या माफिनाम्यात म्हंटलं गेलंय.

‘तांडव’ सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये हिंदू देव-देवतांची हेटाळणी करण्यात आली होती. हा भाग पाहिल्यानंतर अनेकांनी ही सीरिज बॅन करण्याची मागणी केली. देशभरातून या सीरिजला विरोध होत असतानाच राजकीय वर्तुळातूनदेखील या सीरिजचा निषेध करण्यात आला होता. यात भाजपा नेते राम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विरोध दर्शविला होता.