तरुणाईमध्ये सध्या वेब सीरिज पाहण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. ‘सेक्रेड गेम्स’ नंतर भारतात खऱ्या अर्थाने वेब सीरिजचा ट्रेण्ड बदलला असं म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेल्या सीरिजपैकी एक म्हणजे ‘मिर्झापूर’ वेब सीरिज. गुंडगिरी आणि त्याच्या विळख्यात सापडलेली दोन भावंडं यांच्याभोवती ही वेब सीरिज फिरताना दिसते. उत्कंठा वाढवणारा शेवट केल्याने अनेकांना मिर्झापूरच्या सिक्वेलची उत्सुकता लागलेली होती. मिर्झापूरच्या दुसऱ्या भागाला हिरवा कंदील मिळाला आहे. मिर्झापूर सिक्वेलची शूटिंग सध्या सुरु आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या भागाचे कथानक पुनीत कृष्णा यांचे आहे. तर गुरमीत सिंह याचे दिग्दर्शन करणार आहेत.

मिर्झापूरच्या पहिल्या पार्टचे सर्व भाग अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहेत. 16 नोव्हेंबरला मिर्झापूरचा पहिला भाग रिलीज करण्यात आला होता. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. पहिल्या भागात एकूण 9 एपिसोड होते. अंशुमन यांच्या दिग्दर्शनाखाली लवकरच दुसऱ्या भागाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. अद्याप सिक्वेलची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

मिर्झापूरचा पहिला भाग कसा आहे

उत्तर भारतातील बाहुबलींचे स्वत:च्या जिवापुरते मर्यादित साम्राज्य, त्यातून होणारे वाद आणि साम्राज्यांतर्गत होणाऱ्या कुरघोडी हा या वेबसीरिजचा पाया आहे. या बाहुबलींनी सारा प्रदेश आपापल्या पद्धतीने वाटून घेतलेला असतो. मिर्झापूर हे अखण्डा त्रिपाठीचे असते. त्याचे सारे काळे धंदे हे गालिच्याच्या व्यवसायाआड सुरू असतात, त्यामुळे तो कालिन भैय्या म्हणून देखील ओळखला जात असतो. मिर्झापूरमधील एका लग्नाच्या वरातीत त्याचा वाह्यात मुलगा मुन्ना दारूच्या नशेत हवेत गोळीबार करताना नवऱ्या मुलाचाच बळी घेतो. ती केस कोणताही वकील स्वीकारत नाही, पण रमाकांत पंडित ती स्वीकारतात. अर्थातच मुन्ना रमाकांत पंडितांच्या घरात घुसून दमदाटी करतो. परिणामी त्याची दोन्ही मुले गुड्डू आणि बबलू प्रतिकार करतात. त्या मुलांचा हा जोश पाहून कालिन भैय्या त्या दोघांना त्यांच्या व्यवसायात सामावून घेतात. या दोघांमुळे मुन्नाला बाजूला टाकल्याची भावना निर्माण होते. त्यातून पुढचे महाभारत घडते.