‘मिर्झापूर’ आणि ‘इनसाइड एज’ या दोन सीरिजच्या यशानंतर आता अॅमेझॉन प्राइम मेड इन हेवन ही नवीन वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘मेड इन हेवन’मध्ये पारंपरिक भारतीय विवाह सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर दोन वेडिंग प्लॅनर्सच्या नजरेतून दिसणाऱ्या आधुनिक भारतीयांच्या जीवनाची रंजक कथा पाहायला मिळणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना दिल्लीमधील दोन वेडिंग प्लानर्स तारा व करण यांच्या जीवनांची झलक दाखवण्यात आली आहे. एका भव्य विवाह सोहळ्यामधून त्यांची कथा सादर करण्यात आली आहे. बिग फॅट इंडियन वेडिंग असणाऱ्या विवाह सोहळ्यातील परंपरा आणि आधुनिक महत्त्वाकांक्षांचा होणारा सामना, या सोहळ्याच्या अंतरंगात लपलेली अनेक गुपितं आणि असंख्य असत्य गोष्टींवरील पडदा या सीरिजमध्ये उठणार आहे. झोया अख्तर व रीमा कागती यांची निर्मिती असलेली सिरीज ‘मेड इन हेवन’ ८ मार्च रोजी २०० देश व केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होण्यास सज्ज आहे.

या वेब सीरिजमध्ये अर्जुन माथूर, सोभिता धुलिपला, जिम सरभ, काल्की कोचलिन, शशांक अरोरा आणि शिवानी रघुवंशी यांनी भूमिका साकारली आहे. तर झोया अख्तर, नित्य मेहरा, अलंकृत श्रीवास्तव आणि प्रशांत नायर यांनी दिग्दर्शन केले आहे. ९ भागांची ही सीरिज ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.