‘हॅरी पॉटर’ या सुपरहिट चित्रपट मालिकेचा प्रीक्वल ‘फॅन्टॅस्टिक बीस्ट २’ मध्ये हॉलीवुड सुपरस्टार जॉनी डेपची वर्णी लागली आणि त्यावर त्याच्या घटस्फोटित पत्नीने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन वर्षांत जॉनीवर कास्टींग काउच, स्त्री अत्याचार, आर्थिक घोटाळे यासारखे अनेक गंभीर आरोप लावले गेले. त्यातच हॉलीवुडमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात मोठय़ा प्रमाणावर आंदोलन उभे राहिल्यामुळे इतर विकृत कलाकारांप्रमाणे जॉनी डेपवर देखिल बहिष्कार घातला जावा ही मागणी अनेक सामाजिक संस्थांकडून केली जात होती. दरम्यान, अम्बर हर्डने त्याला घटस्फोट दिल्यानंतर तर ही मागणी आणखीन तीव्र झाली.

एकामागून एक होणाऱ्या या गंभीर आरोपांमुळे जॉनीची सिनेकारकिर्द जवळ जवळ संपण्याच्याच मार्गावर आली असताना ‘फॅन्टॅस्टिक बीस्ट’ सारख्या मोठय़ा बजेटच्या चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे त्याच्या विरोधकांनी समाजमाध्यमांवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.चित्रपटसृष्टी सध्या नविन कलाकारांचा गैरफायदा घेणारी प्रतिष्ठीत मंडळी आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणारे जागृत कलाकार या दोघांमध्ये विभागली गेली आहे. घटस्फोट घेतल्यापासून जॉनीबद्दल एकही शब्द न बोलणारी अम्बरही यावरून त्याच्यावर टीका करेल अशी काही मंडळींना अपेक्षा होती. परंतु, तिने उलट या चित्रपटात भूमिका मिळाल्याबद्दल जॉनीची स्तुती केली. तिने ट्विटच्या माध्यमातून त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. तिच्या मते तो प्रियकर म्हणून योग्य नसला तरी अभिनेता म्हणून त्याला तोड नाही. आणि आजही ती त्याच्या अभिनयाची चाहती असून ‘फॅन्टॅस्टिक बीस्ट २’ मधील त्याचा अभिनय पाहण्यासाठी उत्सूक आहे.

गेले वर्षभर कोर्टात सुरु असलेल्या विविध खटल्यांमुळे ‘फॅन्टॅस्टिक बीस्ट’ मधील जॉनीच्या सहभागावरुन निर्मात्यांमध्ये मतभेद होते, परंतु दिग्दर्शक डेव्हिड येट्स आणि लेखिका जे. के. रोलिंग यांनी आचानक आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जॉनी डेपची निवड झाल्याचे सांगत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. तो या चित्रपटात खलनायक गेलर्ट ग्रींडलवॉर्ड ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.