हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेपशी पंगा घेणं अभिनेत्री अॅम्बर हर्डला आता चांगलंच महागात पडलं आहे. डीसी युनिव्हर्सच्या ‘अॅक्वामॅन २’ या बिग बजेट चित्रपटातून तिची जवळपास हकालपट्टी करण्यात आली आहे. अॅम्बरला चित्रपटातून बाहेर काढावं यासाठी जॉनीचे चाहते प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी लाखोंच्या संख्येने निर्मात्यांकडे इमेल आणि पत्रं पाठवली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव अखेर ‘अॅक्वामॅन’मधील तिचं काम एडिट करुन केवळ तीन दृश्यांपुरतंच मर्यादीत ठेवलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
अॅम्बर हर्ड जॉनी डेपची घटस्फोटीत पत्नी आहे. तिने जॉनीवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप केले होते. दरम्यान दोघांच्या खासगी संभाषणाची एक ऑडिओ क्लिप लीक झाली. या ऑडिओ क्लिपमुळे अॅम्बरचे आरोप कोर्टात खोटे सिद्ध झाले. या खोट्या आरोपांमुळे जॉनीचे चाहते अॅम्बरवर संतापले होते. परिणामी चाहत्यांनी अॅम्बरला चित्रपटातून बाहेर काढण्याची विनंती केली होती. मात्र तिला या चित्रपटातून पूर्णपणे बाहेर काढण शक्य नव्हतं. असं केल्यास निर्मात्यांना कोट्यवधींचा नुकसान झाले असते. त्यामुळे तिचं काम निर्मात्यांनी कमी केलं आहे.
‘अॅक्वामॅन २’ हा एक सुपरहिरो चित्रपट आहे. या चित्रपटात अॅम्बर हर्ड ‘मीरा’ नामक व्यक्तिरेखा साकारत आहे. मीरा अॅक्वामॅनची प्रेयसी आहे. तिच्याकडे देखील अॅक्वामॅनप्रमाणेच काही खास शक्ती आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती केली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2020 5:54 pm