करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपट उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सिनेमागृह पुर्णपणे बंद आहेत. कुठलाही नवा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मात्र निर्बंधांचा हा काळ लवकरच संपुष्टात येणार आहे. AMC कंपनीने सिमेमागृह लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जुलैपासून अमेरिकेतील काही शहरांमध्ये सिनेमागृह प्रेक्षकांसाठी खुली केली जाणार आहेत.

AMC ही अमेरिकेतील नामांकित सिनेमागृह कंपनी आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रेक्षकांना ही आनंदाची बातमी दिली. अमेरिकेतील काही शहरांमध्ये करोनाचा प्रभाव ओसरला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळून सिनेमागृह खुली केली जाणार आहेत.

सिनेमागृह सुरु होताच ‘टेनेट’ आणि ‘मुलान’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होतील. अनेक नामांकित OTT प्लॅटफॉर्मने या चित्रपटांना ऑनलाईन प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु निर्माते आपल्या विचारांवर ठाम राहिले. त्यांनी हे चित्रपट मोठ्या स्क्रिनसाठीच तयार केले आहेत, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. परिणामी सर्वात प्रथम प्रदर्शनाचा मान या चित्रपटांनाच देण्यात आला आहे. अमेरिकेत चित्रपट पुन्हा सुरु होणार त्यामुळे भारतीय प्रेक्षक देखील उत्साही झाले आहेत. AMC ने केलेलं ट्विट वाचून भारतात कधी सिनेमागृह सुरु होणार असा प्रश्न त्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. सध्या आपल्याही देशात उद्योगधंदे हळूहळू सुरु केले जात आहेत. निर्मात्यांना चित्रीकरणासही परवानगी दिली गेली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील सिनेमागृह लवकरच सुरु होतील अशी अपेक्षा आहे.