अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच भारतभेटीवर येत आहेत. ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर हेदेखील असणार आहेत. त्यामुळे साऱ्या देशवासीयांचं लक्ष ट्रम्प यांच्या आगमनाकडे लागलं आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचा राज्यकारभार सांभाळणारे ट्रम्प हे कायमच चर्चेचा विषय असतात. त्यामुळे सध्या त्यांच्याविषयी अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये ट्रम्प यांनी चित्रपटामध्ये केलेल्या कामाचीही चर्चा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचा राज्य कारभार सांभाळणाऱ्या ट्रम्प यांनी काही हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र हे फार कमी जणांना माहित आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये आणि शोमध्ये काम केलं आहे. या चित्रपटांमध्ये ते कॅमियो रोलमध्ये दिसले होते. ट्रम्प यांनी काम केलेले काही चित्रपट आणि मालिका –

होम अलोन २ –
१९९२ मध्ये प्रदर्शित झालेला होम अलोन 2 या चित्रपटामध्ये ट्रम्प यांनी छोटेखानी भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील काही सीनचं चित्रीकरण ट्रम्प यांच्या हॉटेलमध्ये झालं होतं. त्यामुळे या चित्रपटामध्ये एक लहानशी भूमिका द्यावी असं ट्रम्प यांनी निर्मात्यांना सांगितलं होतं. याचकारणास्तव या चित्रपटात ट्रम्प कॅमियो रोलमध्ये झळकले आहेत.

दि लिटील रास्कल्स –
हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये ते पाहुण्या कलाकारांच्या रुपात झळकले आहेत. या चित्रपटातील एका दृश्यामध्ये ते फोनवर बोलताना दिसले होते.

दि असोसिएट –
हा विनोदी चित्रपट असून १९९६ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात ट्रम्प यांनी एका व्यावसायिकाची भूमिका साकारली होती.

सडनली सुसॅन –
१९९७ मधील ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील एका भागात ट्रम्प यांनी व्यावसायिकाची भूमिका वठविली होती.

स्पिन सिटी –
स्पिन सिटी नावाच्या एका टीव्ही शोमध्ये त्यांनी सुपरस्टार मायकल फॉक्ससोबत स्क्रीन शेअर केली होती. या कार्यक्रमातही त्यांनी व्यावसायिकाची भूमिकाच साकारली होती.

सेक्स अॅण्ड दि सिटी –
या कार्यक्रमात ते कॅमियो भूमिकेत दिसून आले होते. हा शो १९९९ साली प्रदर्शित झाला असून त्याच्या दुसऱ्या पर्वात ट्रम्प झळकले होते.

ज्युलॅंडर 2001 –
बेन स्टीलर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अनेक सेलिब्रिटी कॅमियो रोलमध्ये झळकले आहेत. यामध्ये ट्रम्प यांचाही समावेश आहे.