अमेरिकेतील ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचे १५ वे पर्व नुकतेच सुरु झालं आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दोन भारतीय डान्सर्सने परीक्षकांसह प्रेक्षकांचीही मने जिंकली आहेत. या दोन्ही डान्सर्सच्या डान्सचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल होत आहे. २० वर्षीय सुमंत आणि १५ वर्षीय सोनाली या दोघांनी ‘बॅड सालसा’ या नावाने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला असून त्यांचा डान्स पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे पहायला मिळालं.
बिवाश अकॅडमी ऑफ डान्सचे (BAD) हे दोन्ही विद्यार्थ्यी ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’मध्ये सहभागी होण्यासाठी कोलकात्याहून अमेरिकेला गेले आहेत. त्यांच्या डान्समधील वेग, चपळता आणि स्टेप्सपाहून परीक्षकांनी त्यांचे तोंड भरुन कौतुक केलं. सुमंत आणि सोनाली हे दोघेही गरीबीमधून पुढे आलेले असून त्यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. या दोघांच्या घरी इतकी गरिबी आहे की कधीकधी त्यांचे पालक त्यांना खाऊ घालून स्वत: उपाशी झोपत असत असं हे दोघे व्हिडिओत सांगताना दिसतात.
या दोघांनी शाहीद कपूर आणि इलियाना डिक्रूझ यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘फटा पोस्टर निकला हीरो’ या चित्रपटातील ‘धतिंग नाच’ या गाण्यावर दोघांनाही सालसा आणि अॅक्रोबॅटिक्स कौशल्याचा सुरेख मेळ साधत डान्स केला. ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’च्या फेसबुक पेजवरून काही दिवसांपूर्वी यांच्या नृत्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ७३ हजारहून अधिक जणांनी शेअर केलं आहे. तर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर आठ हजारहून अधिक कमेंट आल्या आहेत.
या नृत्यानंतर सर्वच परीक्षकांनी या दोघांचे कौतुक केलं. प्रेक्षकांनीही उभं राहून टाळ्या वाजवत या दोघांचं कौतुक केलं. सर्व परीक्षकांनी या दोघांना ‘यस’ असं उत्तर देत पुढच्या फेरीत प्रवेश दिला. सर्वात लोकप्रिय परिक्षक असणाऱ्या सायमन कोवेलने तर “तुम्ही आमच्या मंचावर येऊन हा डान्स केला त्याबद्दल धन्यवाद”, अशी प्रतिक्रिया नोंदवली.
फेब्रुवारी महिन्यामध्ये याच शोधमध्ये वसई-भाईंदरच्या कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत सर्वोत्तम कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला होता. ‘वी अनबिटेबल’ डान्स ग्रुपने ही कामगिरी करुन दाखवली होती. आता बॅड सालसा करणारे सुमंत आणि सोनाली पुन्हा त्याची पुनरावृत्ती करणार का हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 30, 2020 4:30 pm