आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन म्हणजे देव आहे. आता जर आराध्यदेवता सचिनवर चित्रपट येणार असेल तर मग भक्तांची उत्सुकता काही विचारता सोय नाही. मग ‘मुरांबाचे’ आलोक आणि इंदू म्हणजेच अमेय वाघ आणि मिथिला पालकर तरी कसे मागे राहतील! नुकताच त्यांनी ‘सचिन सर पहिला मान तुमचाच’ म्हणत ‘सचिन, द बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या पोस्टरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रेक्षकांच्या भेटीला ‘मुरांबा’ २ जूनला येणार आहे कारण मेच्या २६ तारखेला ते सुद्धा ‘सचिन’ बघायला जाणार असल्याचंही सांगायला ते विसरले नाहीत.

काही दिवसांपूर्वीच आलोकचे आई-बाबा फेसबुकवर लाइव्ह गेल्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता. भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच भा.डि.पा. या वेब चॅनेलने आणि ‘मुरांबा’ च्या टीमने केलेला ‘आई बाबा लाइव्ह जातात तेव्हा’ हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.

मुळात आपली मुलं फेसबुकवर लाइव्ह जातात म्हणजे काय करतात बुवा या उत्सुकतेपोटी लाइव्ह गेल्यानंतर मुलांपेक्षाही भन्नाट कल्पना आई बाबांना सुचतात. लाइव्ह गेल्यानंतर इतके दिवस मुलांनी लपवून ठेवलेलं सिक्रेट अचानकपणे आई बाबा फेसबुकवर घोषित करतात. प्रसंगी‘मार्क झकरबर्गला’ देखील सल्ला द्यायला ते मागे हटत नाहीत. हा व्हिडिओ पाहिला की हे आपल्याही घरात घडू शकतं असं प्रत्येकाच्याच मनात आल्यावाचून रहात नाही. दरम्यान, फेसबुक लाइव्हचे वाढते प्रमाण लक्षात घेत ‘मुरांबा’च्या प्रसिद्धीसाठी हा सारा घाट घालण्यात आला होता हे समजते. टेक्नोसॅव्ही बाबा आणि सोशल मीडियापासून चार हात लांब राहणारी आई साकारताना चिन्मयी सुमित आणि सचिन खेडेकर यांनी विनोदाचे अफलातून टायमिंग या व्हिडिओतून साधले होते.

अमेय वाघ, मिथिला पालकर, चिन्मयी सुमित आणि सचिन खेडेकर हे ‘मुरांबा’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, त्यांच्याव्यतिरिक्त आणखी कोणते नवे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.