07 December 2019

News Flash

‘सेक्रेड गेम्स २’मध्ये मराठमोळ्या अमेय वाघची एण्ट्री

सीरिजमधील भूमिकेविषयी अमेय म्हणतो...

अमेय वाघ

वेब विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा सीक्वल अवघ्या दोन दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागामध्ये असलेल्या कथानक, तगडे कलाकार, अभिनय, संवाद आणि सिनेमॅटीक लिबर्टीच्या बळावर या सीरिजने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता रसिकप्रेक्षकांची ‘सेक्रेड गेम्स २’बाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या भागामधील सैफ अली खान (सरताज सिंग), नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे), जतिन सारना (बंटी), पंकज त्रिपाठी (गणेश गायतोंडेचा तिसरा गुरु) हे पुढच्या भागातही दिसणार आहेत. मात्र यामध्ये नवीन कलाकारांचा समावेशही झाला आहे. दुसऱ्या पर्वामध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन, अभिनेता रणवीर शौरी या दोन नवीन कलाकारांसह मराठमोळा अभिनेता अमेय वाघ देखील दिसणार आहे. यासंदर्भातील माहिती अमेयने ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी बोलताना दिली.

‘सेक्रेड गेम्स’चा पहिला सिझन प्रदर्शित होताच अमेयने त्याचे सर्व एपिसोड्स एका दिवसात पाहिले होते. तेव्हापासून या वेब सीरिजमध्ये काम करण्याचे अमेयचे स्वप्न होते. ‘मी सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन सलग पाहिला होता. त्यामुळे मी या वेब सीरिजच्या प्रेमात होतो. सहा सात महिन्यांनंतर सेक्रेड गेम्समधील एका भूमिकेसाठी मला ऑडिशन देण्यास बोलवण्यात आले पण दुर्दैवाने माझी निवड झाली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मी दुसऱ्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले आणि माझी निवड झाली. त्यावेळी मला माझे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटले’ असे अमेय म्हणाला.

”सेक्रेड गेम्स २’मधील भूमिकेविषयी मला फारसे सांगता येणार नाही. पण मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही पूर्णपणे वेगळी असणार आहे. मी सेक्रेड गेम्स २ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे”, असा खुलासा अमेयने केला आहे. एकंदरीत अमेयच्या अभिनयाची एक वेगळी छटा सेक्रेड गेम्यमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हा सुखद धक्का असेल यात काही शंका नाही.

‘सेक्रेड गेम्स २’चे दिग्दर्शन अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी केले आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी ही सीरिज ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सिझनमध्ये न मिळालेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या सिझनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

First Published on August 13, 2019 4:17 pm

Web Title: amey wagh is going to play role in sacred games 2 avb 95
Just Now!
X