अभिनेत्री सोनाली बेंद्रे कर्करोगाच्या उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. या उपचाराच्या टप्प्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाद्वारे सोनाली चाहत्यांना सांगत आहे. केमोथेरेपीमुळे तिला केस कापावे लागले. त्यानंतर आता नकली केसांच्या टोपचा (विग) वापर करत सोनालीने आपला नवा लूक शेअर केला आहे. त्याचसोबत या लूकसाठी तिने अभिनेत्री प्रियांका चोप्राचे आभार मानले आहेत.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये सोनालीच्या चेहऱ्यावरचं तेज आणि ओसंडून वाहणारा उत्साह अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. यासोबतच तिने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या सुरुवातीला तिने प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता अल पचिनो याचे एक वाक्य लिहिले आहे. ‘Vanity is my favourite sin म्हणजेच स्वताःबद्दल अवास्तव गर्व वाटणं हे माझं सर्वात आवडतं पाप आहे. ‘

यापुढे ती लिहिते की, ‘हे नेहमीच माझं आवडतं पाप नाही (कारण ती अतिशयोक्ती वाटेल), पण सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही? आपण जसं दिसतो त्याचा आपल्या मनावर काही प्रमाणात परिणाम होत असतो. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात स्वत:विषयी गर्व वाटत असल्यास त्याचं कोणालाही नुकसान होत नाही. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद मिळतो, त्या करणं महत्त्वाचं आहे. मग ते नकली केसांचं टोप घालणं असो, लाल रंगाची लिपस्टिक लावणं असो किंवा उंच टाचांची चप्पल घालणं असो. त्यावर मग लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुमच्यासाठी काय योग्य आणि अयोग्य आहे हे कोणीच तुम्हाला सांगू शकत नाही. जेव्हा मी विग वापरण्याचा विचार केला आणि ते कसं दिसेल हे पाहत होती, तेव्हा एका क्षणासाठी मलाही वाटलं की हे चांगलं दिसण्यासाठीचे माझे प्रयत्न व्यर्थ ठरणार आहेत का? मनोरंजन विश्वात तुम्ही काम करत असाल तर तुम्ही चांगलं दिसलंच पाहिजे अशी अपेक्षा असते. कदाचित याच गोष्टीमुळे मी विग वापरण्याचा प्रयत्न केला. पण त्याने जर मी सुंदर दिसत असेन तर मला नक्कीच आवडेल. जर मला स्कार्फ घालण्याची इच्छा असेल तर मी घालेन. जर विगशिवाय मला मोकळेपणाने फिरायचं असेल तर मी तसंही फिरेन. कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात आणि कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद मिळेल हे फक्त तुम्हालाच माहित असतं.’

या नव्या लूकसाठी प्रियांकाने एका हेअर स्टाइलिस्टशी सोनालीचा संपर्क साधून दिला. त्यामुळे या पोस्टमध्ये सोनालीने अभिनेत्री प्रियांका चोप्राचे विशेष आभार मानले आहेत.