सदाबहार आवाजाची देणगी लाभलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी ‘गीतमाला’ या कार्यक्रमाद्वारे रसिकांच्या प्रत्यक्ष भेटीला येत आहेत. ‘बिनाका गीतमाले’च्या रम्य दिवसांना उजाळा मिळताच संगीताचा सुवर्णकाळही पुन्हा साकारणार आहे. ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात सात फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजता गीतमाला हा कार्यक्रम ते सादर करणार आहेत.

पार्टी खूपच रंगात आली होती. िहदी सिनेमासृष्टीतल्या तारे-तारका झाडून त्यात सहभागी झाल्या होत्या. गप्पांच्या केंद्रस्थानी होता, तेव्हाचा नवा सिनेमा ‘संगम’! त्यातही संगमच्या गाण्यांविषयी जोरदार चर्चा सुरू होती. ‘बिनाका गीतमाले’त त्यावेळी ‘दोस्त दोस्त ना रहा’ जास्त गाजत असल्याने संगीतकार शंकर खुशीत होता, त्याच वेळी कोणीतरी कळीचा नारद जयकिशनच्या कानाशी लागून म्हणाला, तुमचं ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर’ तर खूपच मागे पडलंय बिनाकामध्ये. यावर जयकिशनचं उत्तर होतं, थोडे दिवस थांबा, ये मेरा..पुढे जाईल बघा. या नारदाने शंकरला ताबडतोब जयकिशनचं भाकीत सांगितलं. झालं, या दोघांमध्ये तिथेच बाचाबाची सुरू झाली. कालांतराने जयकिशनचं म्हणणं खरं ठरलं आणि त्यांच्यातली दरी वाढतच गेली..
सांगायचा मुद्दा म्हणजे, गाण्याच्या लोकप्रियतेसाठी सर्वसामान्य कानसेन जेव्हा बिनाका गीतमालेचा निकष लावत होते, आधार घेत होते, त्यास शंकर-जयकिशनसारखे महान संगीतकारही अपवाद नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हवं ते गाणं आता मोबाइल, म्युझिक प्लेअरच्या माध्यमातून मुठीत आलं आहे. कोणतंही गाणं सहज डाऊनलोड करण्याची सुविधाही आता सहजसाध्य आहे. मात्र, यातलं काहीच नव्हतं त्या काळी कानसेनांना रेडिओचाच आधार होता आणि त्यातही बिनाका गीतमालेसारखे कार्यक्रम म्हणजे सोनेपे सुहागाच. ही गीतमाला लोकप्रिय होण्याचं श्रेय अर्थातच सिनेसंगीताच्या सुवर्णकाळाचं आणि त्याची जमेची बाजू म्हणजे अमीन सयानी यांचं शैलीदार, रसाळ निवेदन. दर बुधवारी रात्री नऊ वाजता जगभरातले रसिक कानात प्राण आणून रेडिओ सिलोनचा हा कार्यक्रम ऐकत असत. हा प्रकार थोडीथोडकी नाही, तर ३६ वष्रे म्हणजे १९५२ ते १९८८ पर्यंत सुरू होता. (त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन १९९४ पर्यंत हा कार्यक्रम विविध भारतीवर चालला) ‘बहनो और भाईयो, अगली पायदानपे है ये गाना..’ ही अमीनजींची शैली आजही अनेकांच्या स्मरणात आहे. अमीनजी हे केवळ निवेदक नव्हते, तर ही गाणी ऐतिहासिक ठरणार आहेत, याचं त्यांना भान होतं, म्हणूनच त्या त्या गीतकार, संगीतकार, गायक-गायिकांना बोलतं करून त्या गाण्यांच्या सृजनाचा प्रवास  मुद्रित करून ठेवण्याची कल्पकता त्यांनी दाखविली. अमीनजींकडे आजही असं हजारो तासांचं ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे, त्यात अनेक दिग्गज गायक-संगीतकारांच्या मुलाखतींचा समावेश आहे.
आज वयाच्या ८२व्या वर्षीही त्यांचा उत्साह कायम आहे. आधी रेडिओ सिटी आणि आणि आता बिग एफएमच्या माध्यमातून (संगीतके सितारोंकी महफिल, सोमवार ते शुक्रवार दुपारी एक ते दोन!) आजही ते रेडिओवर सक्रिय आहेत, त्या सुवर्णकाळाला उजाळा देत आहेत.. आणि हे कमी म्हणून ते स्वत: एक कार्यक्रम सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात सात फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजता गीतमाला हा कार्यक्रम ते करतायत! लोटस लीफ एंटरटेनमेंटचे आयोजन असलेल्या या कार्यक्रमात गौरव बांगिया आणि अमृता नातू हे सारेगमपचे विजेते जुनी गाणी सादर करणार आहेत. संगीताचा सुवर्णकाळ ज्यांनी घडवला त्या सहा संगीतकारांची म्हणजे शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, मदनमोहन, सचिनदेव बर्मन, राहुलदेव बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची गाणी त्यांनी निवडली आहेत. या सर्व संगीतकारांच्या अमीनजींनी घेतलेल्या दुर्मीळ मुलाखती त्या त्या गाण्याआधी पडद्यावर पाहता येणार आहेत. बदलत्या संगीत प्रवाहाने गढूळ झालेल्या पाण्याला ‘त्या’ जिवंत झऱ्यामुळे नवं निर्मळ रुपडं लाभणार आहे

रेकॉर्डची विक्री आणि श्रोत्यांची पत्रं या निकषांवर आम्ही गाण्यांचं रेटिंग ठरवत असू. बिनाका गीतमालेची लोकप्रियता एवढी वाढत गेली की १९६० पर्यंत आशिया, पूर्व आफ्रिका आणि अन्य देशांत मिळून गीतमालेला २१ कोटी श्रोते लाभले होते. एवढी लोकप्रियता रेडिओच्या अन्य कोणत्याही कार्यक्रमाला लाभली नाही.
अमीन सयानी

– अनिरुद्ध भातखंडे