बॉलीवूडमध्ये आपल्या चित्रपटासाठी प्रेक्षकांची गर्दी खेचणारा, तिकीटबारीवर कोटय़वधी कमाई करून देणारा अभिनेता हा सुपरस्टार मानला जातो. अशा गर्दी खेचणाऱ्या बॉलीवूडच्या अभिनेत्यांमध्ये आमिर खान हे नाव अग्रणी आहे आणि तरीही गर्दीतून उठून दिसणारं असं वेगळं नाव आहे. एकतर तो त्या व्यक्तिरेखेत शिरून, खूप मन लावून भूमिका करतो. त्यासाठी तितकाच वेळही देतो-मेहनतही घेतो आणि म्हणूनच तो वर्षांला एकच चित्रपट करायचा हे सूत्रही गेली कित्येक वर्ष कसोशीने जपत आला आहे. मात्र गेलं वर्ष इतर अनेक कलाकारांप्रमाणे आमिरसाठीही शून्य चित्रपटाचं ठरलं आहे. त्यामुळे यावर्षी तो एकाचवेळी तीन चित्रपटांवर काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आमिर खानने २०१९ मध्ये ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाची सुरुवात केली होती. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या, हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्सची मुख्य भूमिका असलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २०१९ मध्ये सुरू होणार होते, मात्र ते त्यावेळी सुरू झाले नाही. लागोपाठ आलेल्या करोना संकटामुळे हे चित्रीकरण रखडले. अखेर गेल्या वर्षी टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आमिरने पुन्हा एकदा सुरुवात केली. आता यावर्षीच्या नाताळचा मुहूर्त साधून हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा त्याचा विचार आहे. मात्र ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाचे चित्रीकरण आता पूर्ण झाले असताना तो नवीन कोणत्या चित्रपटावर काम सुरू करणार, याची चर्चा सुरू आहे. यात प्राधान्याने चर्चा सुरू आहे ती ‘मोगल’ या चित्रपटाची.. टी सीरिज कंपनीचे संस्थापक गुलशन कु मार यांच्यावर आधारित या चरित्रपटात पहिल्यांदा अक्षय कु मार मुख्य भूमिके त होता. मात्र अचानक काही वादानंतर त्याने हा चित्रपट सोडून दिला. मग आमिरने हा चित्रपट करायचा निर्णय घेतला, पण काही दिवसांनंतर त्यानेही हा चित्रपट सोडल्याचे सांगितले गेले. मात्र आपल्या या निर्णयाचा फे रविचार करत आमिरने पुन्हा एकदा ‘मोगल’ हा चित्रपट करायचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान आणि भूषण कु मार संयुक्तरीत्या करणार असून यावर्षी मे महिन्यानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

‘मोगल’ या चित्रपटाशिवाय २०१८ साली हिट झालेल्या ‘कॅम्पेओनीस’ (चॅम्पिनयन) या स्पॅनिश चित्रपटाच्या रिमेकचाही विचार आमिरकडून सुरू आहे. सोनी पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना करणार आहे. या दोन चित्रपटांच्या बरोबरीने आणखी एका चरित्रपटासाठी आमिरबरोबर बोलणी सुरू असल्याचे सांगितले जाते, मात्र या चित्रपटाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे एकावेळी तीन चित्रपटांविषयी आमिरची बोलणी सुरू आहेत, प्रत्यक्षात तो त्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एकावेळी एकच चित्रपट करणार यात शंका नाही. मात्र पूर्वीप्रमाणे एक वर्ष, एक चित्रपट हे त्याचे समीकरण आता यापुढे राहणार नाही, असा विश्वास ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. करोनामुळे चित्रपटसृष्टीची अनेक गणितं बदलली आहेत, आमिरही याला अपवाद ठरलेला नाही.