News Flash

भुतांमागचे हात

चित्रपट, मालिकांत मेकअप आर्टिस्टना दादा म्हणून संबोधण्याची प्रथा आहे.

अमित म्हात्रेही कलाकारांचे लाडके अमितदादा आहेत.

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

पडद्यामागचे
‘कोणाला अपघात झाला, भाजलं, कापलं तर त्या जखमा इतरांना पाहवत नाहीत, पण आम्ही मात्र त्यांचं बारकाईने निरीक्षण करतो. ते व्रण, त्यांचा रंग, पोत लक्षात ठेवतो. कारण पडद्यावर धडधाकट माणसाला जखमी रूपात दाखवण्यासाठी आमचं हेच निरीक्षण उपयोगी पडणार असतं,’ रंगभूषाकार अमित म्हात्रे सांगतात. छोटय़ा पडद्यावर सध्या ज्यांची दहशत निर्माण झाली आहे, अशी ‘रात्रीस खेळ चाले’मधली भुतं त्यांनी साकारली आहेत. शेवंता, दत्ता, सरिताला ‘चेहरा’ मिळवून देणाऱ्या अमितकडून त्याच्या कलेविषयी बरंच काही जाणून घेता येतं.

चित्रपट, मालिकांत मेकअप आर्टिस्टना दादा म्हणून संबोधण्याची प्रथा आहे. अमित म्हात्रेही कलाकारांचे लाडके अमितदादा आहेत. त्यांनी मेकअपचं औपचारिक शिक्षण घेतलं नाही. पण या कलेतल्या चालत्या बोलत्या विद्यापीठाच्या, पंढरीनाथ जुकर यांच्या सहवासात ते वाढले. पंढरीनाथ दादा त्यांचे सख्खे मामा. त्यांच्याकडून लाभलेल्या वारशाविषयी अमित सांगतात, ‘माझं बालपण आजोळी गेलं. मामा काम करत असताना त्यांच्या बाजूला उभं राहून पाहायचो. मधुबाला, शर्मिला टागोर यांच्यासारखे मोठे कलाकार त्यांच्याकडे येऊन मेकअप करून जायचे. चेहऱ्याच्या ठेवणीतील त्रुटी कशा हेराव्यात, त्या दूर करण्यासाठी काय करावं, नाक तरतरीत दिसावं म्हणून कसा मेकअप करतात, हे बालपणापासून पाहत होतो. आपणही हेच काम करावं असं वाटे. पण मामांना वाटत होतं की, घरातल्या मुलांनी काही तरी वेगळं करावं. कलेची आवड होती. त्यामुळे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. कलेचं शिक्षण घेतलं. आर्किटेक्ट, इंटिरिअर डिझायनर म्हणून कामही केलं. पण त्यात मन रमलं नाही. लहानपणापासून आत्मसात केलेल्या कलेचे प्रयोग करून पाहण्याची इच्छा शांत बसू देत नव्हती. अखेर मामांनी परवानगी दिली.’

२००० साली पंढरीदादांनी अमितना ‘कुसुम’ ही सोनी वाहिनीवरची मालिका मिळवून दिली आणि रंगभूषेच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण झालं. ‘ही मालिका सुरू झाल्यापासून संपेपर्यंत तिचं काम कर. शक्य तेवढं शिकून घे आणि मग तुला हवी ती कामं कर,’ असा सल्ला पंढरीनाथ दादा यांनी अमितना दिला. मिळालेल्या संधीचं अमित यांनी सोनं केलं. तब्बल साडेचार ते पाच र्वष ही मालिका चालली आणि त्यातल्या त्यांच्या कामाची वाहवा सुद्धा झाली. त्यातून अमितना अनेक कामं मिळाली. चित्रपट, मालिका, रिअ‍ॅलिटी शो, जाहिराती, स्टेज शो, कलाकारांचा खासगी रंगभूषाकार अशी अनेक कामं त्यांनी केली.

अमित सांगतात, ‘प्रत्येक माध्यमातली मेकअपची गरज वेगळी असते. मालिकांसाठी हेवी म्हणजे थोडा भडक मेकअप करावा लागतो. सिनेमामध्ये पूर्वी ज्या पद्धतीने मेकअप केला जात असे तसा आता केला जात नाही. आता कलाकाराला अधिकाधिक नैसर्गिक रूपात दाखवावं लागतं. जाहिरातीतही असाच नैसर्गिक लुक अपेक्षित असतो.’ त्यांनी ही सर्व कौशल्यं आत्मसात केली आहेत.

दक्षिणेतील अभिनेता वरुण तेजचा खासगी रंगभूषाकार म्हणून त्यांनी बराच काळ काम केलं. त्याविषयी ते सांगतात, ‘दक्षिणेत कामाची पद्धत फारंच काटेकोर आहे. त्यांना नेमका कसा लुक हवा आहे, हे पक्कं माहीत असतं. काम वेळेवर सुरू होतं आणि वेळेत पॅकअप होतं. तिथे काम करण्याचा अनुभव बरंच काही शिकवून गेला. वरुणबरोबर देशात तसंच परदेशांतही दौरे केले. तिथल्या चित्रपटांमध्ये मारधाड जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जखमा हुबेहूब दाखवण्याचं कौशल्य तिथे आत्मसात करता आलं आणि त्याचा फायदा आता झी मराठीच्या ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये होतोय. वरुण आणि मला एकमेकांबरोबर काम करण्याची खूपच सवय झाली होती. पण मला दक्षिणेत कायम राहायचं नव्हतं. मुंबईत यायचं होतं. वरुणला दुसरा आर्टिस्ट मिळवून देऊन मी मुंबईत आलो.’

इथे ‘चक दे बच्चे’ हा बालकांबरोबरचा शो त्यांनी केला. त्याबद्दल ते सांगतात, ‘लहान मुलांबरोबर काम करणं फार कठीण असतं. एक तर ती एका जागी शांत बसत नाहीत, हे उचल, ते उघडून पाहा असं त्यांचं सुरू असतं. ती सतत प्रश्न विचारत राहतात. कधी त्यांच्या कलाने तर कधी धाकात घेऊन काम करावं लागतं. त्या शोमध्येही आम्ही वेगवेगळे प्रयोग केले. एका मुलाला आगीच्या ज्वाळांसारखा लुक द्यायचा होता. त्यासाठी पूर्ण शरीर केशरी रंगात रंगवलं आणि अंगभर केशरी आय लॅशेस लावल्या. एका मुलाला पाण्याचा लुक द्यायचा होता, त्या वेळी त्याचं शरीर निळ्या रंगाने रंगवून पाण्यासारख्या छटा दिल्या.’ अशा आठवणी ते सांगतात.

‘सचिन नागरगोजे माझे मित्र आहेत. त्यांनी ‘तप्तपदी’ चित्रपटासाठी बोलावलं. त्या चित्रपटात १९४७चा काळ दाखवायचा होता. पीरियड फिल्म असली तरी त्यातील कलाकारांना ग्लॅमरस लुक द्यायचा होता. हे मोठंच आव्हान होतं. शरद पोंक्षे, वीणा जामदार, श्रुती मराठेसारखे कलाकार होते. नऊवारी साडी वगैरे अगदी मराठमोळी वेशभूषा होती. हा प्रयोग उत्तम जमून आला.’ त्याव्यतिरिक्त त्यांनी ‘दस कहानियाँ’, पंख’सारखे चित्रपट केले. एक पंजाबी चित्रपटही केल्याचं अमित सांगतात.

‘रात्रीस खेळ चाले’च्या कलाकारांचे लुक इतर मालिकांतील कलाकारांप्रमाणे चकचकीत नाहीत. त्यांचा गावरान बाज चेहऱ्यावर दिसतो आणि त्यामुळेच ते अधिक खरेखुरे वाटतात. यामागचं कारण अमित यांनी स्पष्ट केलं. ‘रात्रीस खेळ’चं काम करताना खूप मजा येते. सुनील भोसलेंना या मालिकेसाठी इतर मालिकांप्रमाणे भडक मेकअप नको होता. वास्तवाच्या शक्य तेवढा जवळ जाईल, असा मेकअप त्यांना अपेक्षित होता. ते मी साधू शकलो. त्यांना भुतंही टिपिकल नको होती आणि भुतांना कथेशी संदर्भ लागेल, असे लुक द्यायचे होते. उदाहरणच द्यायचं झालं, तर शेवंताचा नवरा पाटणकर विहिरीत पडून मेलेला दाखवला आहे. त्यामुळे त्याचं भूत दाखवताना चेहरा माशांनी कुरतडलेला दाखवला. पांढरी बुब्बुळं असलेली भुतं तर फार फारच गाजत आहेत. त्यासाठी पांढऱ्या रंगाच्या खास लेन्सेस वापरल्या. भुतांच्या लुकसाठी आम्ही परदेशी चित्रपटांतील काही व्यक्तिरेखांचा अभ्यास केला. विविध संदर्भ शोधून प्रयोग केले. प्रत्येक भूमिकेसाठी दोन ते तीन लुक तयार करून झी मराठीकडे पाठवले. त्यातून त्यांनी निवडलेले लुक्स वापरले गेले.’

एका दृश्यात शेवंताच्या पायात काच रुतली आहे आणि पायातून रक्त ओघळत आहे, असं दाखवायचं होतं. जिथे चित्रीकरण केलं जातं ते अकेरी गाव सावंतवाडीच्या दुर्गम भागात आहे. तिथे ऐनवेळी कोणतीही प्रॉपर्टी पटकन उपलब्ध होत नाही. काचेमुळे झालेली जखम कशी दाखवायची असा प्रश्न पडला होता. मग एक प्लास्टिकची पारदर्शक डबी तोडली आणि तिचा एक तुकडा आय लॅशेस चिकटवण्याच्या ग्लूने पावलाला चिकटवला. त्यावर रक्ताचा रंग टाकला आणि चित्रीकरण केलं. अशा युक्त्या अनेकदा लढवाव्या लागतात आणि असं काम करताना मजा येते.’

‘२० वर्षांच्या व्यक्तीचं वय ५० र्वष दाखवताना आम्ही सिलिकॉन किंवा लॅटेक्स वापरतो. त्याचा बेस लावला आणि ड्रायरने वाळवला, की तो रबरसारखा होतो आणि सुरकुत्या दिसू लागतात, मग त्यावर शेडिंग केलं जातं. जुन्या जखमांसाठी ड्राय ब्लड आणि ताज्या जखमांसाठी वेट ब्लड हे रंग वापरले जातात. त्यांच्या साहाय्याने जखमा हुबेहूब वठवल्या जातात. मेकअप पूर्ण झाल्यावर मला स्वतलाच आरशात पाहायची भीती वाटतेय, असं कलाकार म्हणतात, तेव्हा ती काम उत्तम झाल्याची पावती असते,’ अमित उत्साहाने सांगतात. ‘एकदा एक लुक निश्चित झाला, की मी माझ्या सहकाऱ्यांकडून त्याचा सराव करून घेतो. जोपर्यंत हुबेहूब वठत नाही तोपर्यंत मीच मेकअप करतो. एकदा त्यांचा हात बसला, की मात्र तेच मेकअप करतात.’

या क्षेत्रातील नव्या मुलांविषयी ते सांगतात, ‘हल्ली इंटनेटमुळे अख्ख्या जगभरातील ज्ञान सहज उपलब्ध होत आहे. जगात मेकअपसाठी कोणती तंत्र वापरली जातात हे आपण घरात बसून शिकू शकतो, थोडय़ा सरावाने ते आत्मसात करू शकतो. पण सगळं काही सहज उपलब्ध असल्यामुळे असेल कदाचित, पण नव्या पिढीकडे मेहनत घेण्याची वृत्ती थोडी कमीच आहे. माझ्या साहाय्यकांशी मी मित्राप्रमाणेच वागतो, पण मनापासून काम केलं नाही, की दमातही घ्यावं लागतं. कोणाला काही लागलं, जखम झाली, की त्याचं नीट निरीक्षण करण्याची सक्त ताकीदच त्यांना देऊन ठेवली आहे. माझ्या हट्टामुळे ते कधी कधी कंटाळतात, पण त्यांना घडवणं हेच माझं काम आहे,’ अमित सांगतात.

नटून, सजून तयार होणं हे खरं तर महिलांचं क्षेत्र, पण नटवण्याच्या व्यवसायात मात्र पुरुषांचाच वरचष्मा दिसतो, असं का, याविषयी अमित म्हणतात, ‘पुरुषाचा मेकअप फारंच जुजबी असतो. त्यात फार काही करावं लागत नाही. पण स्त्रियांचा मेकअप करणं हे मोठं कौशल्याचं काम असतं. त्यात मेकअप आर्टिस्टला खूप वाव मिळतो. पंढरीनाथ मामा नेहमी म्हणायचे, स्त्रीच्या सौंदर्याचं आकलन पुरुषालाच उत्तम होतं. त्यांचं म्हणणं मला पटलं आहे.’

कलाकार पडद्यावर दिसतात, त्यामुळे त्यांना तर ग्लॅमर आहेच. दिग्दर्शक, लेखक, गीतकार, गायक, संगीतकार यांनाही ओळख, मान्यता, लोकप्रियता मिळते. पण पडद्यावरचं सौंदर्य साकारणारा रंगभूषाकार मात्र फारच क्वचित प्रेक्षकांसमोर येतो. पुरस्कार सोहळ्यांतही त्याला गौरवलं जाण्याचा प्रसंग विरळाच. याविषयी अमित यांना विचारल्यावर ते म्हणतात, ‘मानधन, पुरस्कार, लोकप्रियता, समाजमान्यता या सगळ्यापेक्षा कलाकारचं समाधान हे माझ्यासाठी सर्वात मोठं पारितोषिक आहे. ते मिळालं की, मी समाधानी असतो.’
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 6:04 pm

Web Title: amit mhatre makeup man horror makeup
Next Stories
1 सुशांत सिंग रजपूतची नवी गर्लफ्रेंड? फोटो झाला व्हायरल
2 Video : हसवून हसवून बेजार करणारा ‘चोरीचा मामला’
3 अफजल गुरू बळीचा बकरा; सोनी राझदान यांचं वादग्रस्त वक्तव्य
Just Now!
X