‘ब्रीद : इन्टू द शॅडो’ या वेब सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी चर्चेत आलेला अभिनेता अमित साध नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मानसिक आरोग्याविषयी व्यक्त झाला. किशोरवयात असताना चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा त्याने या मुलाखतीत केला.

‘मेन्स एक्सपी’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “१६ ते १८ वर्षांच्या वयात मी स्वत: चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माझ्या डोक्यात सतत आत्महत्येचा विचार नव्हता, काही प्लॅनिंग नव्हती. अचानकच माझी जगण्याची इच्छा निघून जायची. जेव्हा चौथ्यादा प्रयत्न केला, तेव्हा खरंच मनातून वाटलं की आपण असं जगू शकत नाही. आपला शेवट असा असू नये. तेव्हापासून माझी मानसिकता बदलली. काहीही झालं तरी हार मानू नये, असं मनाशी पक्कं ठरवलं आणि पुढचा प्रवास सुरू केला.” जवळपास वीस वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर नैराश्य, चिडचिडेपणा, आत्महत्येचा विचार यांपासून मुक्तता मिळाल्याचं त्याने सांगितलं.

आणखी वाचा : “कौटुंबिक वाद सार्वजनिक करणं म्हणजे…”; कृष्णाला गोविंदाचा टोला

‘काय पो चे’, ‘गुड्डू रंगीला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. मालिकेतून करिअरची सुरुवात करणाऱ्या अमित साधकडे आता एक प्रतिभावान कलाकार म्हणून पाहिलं जातं.