गुजरातमधील कच्छ येथील विकास उत्सव २०२० कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. २००१ मध्ये भूजमध्ये भूकंप झाला होता तेव्हा मी इथे आलो होतो. त्यावेळी ही जागा पूर्णपणे उद्धवस्त झाली होती. भूकंपने येथील जमीन पूर्णपणे हदरुन गेलेली. मात्र आज येथे मॉल आणि इमारती उभ्या असून चित्र पूर्णपणे बदलेलं आहे. हे चित्र आशादायक असून भूजमधील जनतेसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं जात आहे याचाच हा पुरावा आहे, असं यावेळी शाह यांनी म्हटलं. यावेळी सीमा भागातील गावांमध्ये काम करण्यासाठी सरकार प्राधान्य देत असल्याचे सांगताना शाह यांनी आता भारतीय जवान सीमेवर शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देतात असंही म्हटलं आहे.

भूकंपानंतर कच्छ आणि भूज आज पुन्हा नव्या जोमाने उभं राहू शकलं याचं पूर्ण श्रेय मोदींच्या दूरदृष्टीला आणि भूजमधील लोकांच्या संघर्ष करण्याच्या ध्येयशक्तीला तसेच कष्टाला द्यावं लागेल असंही शाह म्हणाले. “आपल्या सीमेवरील गावातील नागरिकांना सुविधा प्रदान करणे हा या विकासोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. इतर गावांप्रमाणे या गावांनाही सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने या उत्सावाचे आयोजन केलं आहे. सीमेवरील सुरक्षा करण्यासाठी आपल्या सुरक्षा दलांतील जवानांबरोबरच सीमेवरील गावांमध्ये नागरिकही महत्वपूर्ण भूमिका बजावतात,” अशा शब्दांमध्ये शाह यांनी सीमेवरील गावातील नागरिकांचं कौतुक केलं.

सीमेवरील गावांमध्ये सरकारची प्रत्येक योजना पोहचली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात, असंही शाह यांनी सांगितलं. सीमेवरील गावांमधून लोकांनी स्थलांतर करु नये यासाठी सर्व सुविधा गावकऱ्यांना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही शाह यांनी दिली. त्याचप्रमाणे शाह यांनी एक काळ असा होता जेव्हा आपल्या देशावर, आपल्या जवानांवर हल्ला व्हायचा तेव्हा कोणतीच कारवाई केली जायची नाही. केवळ वक्तव्य केली जायची. मात्र आज बीएसएफचे जवान शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देऊ लागले आहेत, असं सांगत भारतीय सीमा आणि सीमेजवळचा प्रदेश अधिक सुरक्षित असल्याचं नमूद केलं.